भिगवणकरांना मिळणार नवीन सुसज्ज बस स्थानक
भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील बस स्थानकाची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. याबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये आवाज उठवण्यात आला होता. याची दखल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली. भिगवण बसस्थानकास भेट देऊन या बस स्थानकाची पाहणी केली व पावसाळा संपल्यानंतर या बस स्थानकाच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी भिगवणकरांना दिले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला भिगवणमधील बस स्थानकाचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या भिगवण बस स्थानकाची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती, हे बसस्थानक अक्षरश: मोडकळीस आलेले होते. रात्री-अपरात्री प्रवाशांची खूप गैरसोय होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील सर्व बस स्थानकांची ते पाहणी करत आहेत. त्यांनी भिगवण या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना या बसस्थानकाच्या संदर्भात सूचना दिल्या.
दैनिक ‘नवराष्ट्र’कडून पाठपुरावा
भिगवण बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत दैनिक ‘नवराष्ट्र’ने बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. अखेर झालेल्या मुसळधार पावसात या बस स्थानकाला मोठ्या तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. याबाबतचे वृत्त देखील ‘नवराष्ट्र’ने प्रसिद्ध केले होते.