विशेष रेल्वेंनाही वेटिंगचा फटका (फोटो- ai gemini)
विशेष रेल्वेंनाही वेटिंगचा फटका
नियमित गाड्यांचे आरक्षण संपले
विशेष रेल्वेंना पिंपरी-चिंचवडमध्ये थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
पुणे/Railway: दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे आरक्षणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण बहुतांश मार्गांवर फुल्ल झाले असून, अनेक गाड्यांची तिकिटे वेटिंगवर आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवर विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, या विशेष गाड्यांचेही आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये हे नागरिक कुटुंबासह गावी जाण्यास प्राधान्य देतात. कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा असल्याने रेल्वेला प्रवाशांची पसंती मिळते. मात्र, सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने आरक्षण मिळविणे कठीण झाले आहे. यंदा ५ नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सुरू होत असल्याने आधीपासूनच तिकीट आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बहुतांश गाड्यांचे आरक्षण उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा विचार करावा लागत आहे.
Diwali 2026: धनत्रयोदशीला वही खरेदी, लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन; काय आहे परंपरेमागील धार्मिक महत्त्व
दिवाळी आणि छठपूजेनिमित्त रेल्वे प्रशासनाने पुणे, खडकी आणि हडपसर स्थानकांवरून विविध मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. हडपसर-मुजफ्फरपूर, हडपसर-गाझीपूर, हडपसर-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-दाणापूर, हडपसर-प्रयागराज, पुणे-मुजफ्फरपूर यांसह अन्य मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. मात्र, या विशेष गाड्यांना पिंपरी आणि चिंचवड स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी पुणे, खडकी किंवा हडपसर स्थानक गाठावे लागणार आहे.
प्रवाशांसाठी तत्काळ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे. गाडी सुटण्याच्या एक दिवस आधी वातानुकूलित श्रेणीतील तिकिटांसाठी सकाळी १० ते ११, तर स्लीपर श्रेणीतील तिकिटांसाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत आरक्षण करता येते. मात्र, या सुविधेतूनही तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.
दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे, खडकी आणि हडपसर या रेल्वे स्थानकांवरून विविध मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.
– हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी,
मध्य रेल्वे, पुणे विभाग
Ans: विशेष गाड्यांना पिंपरी आणि चिंचवड स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नाहीये.
Ans: विशेष गाड्यांचेही आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.






