पिंपरी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी ८ डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये नागरिकांसह संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवरायांचे विचार जुने झाले, हे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. तर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांनी माफीनामा लिहून दिला होता, असे विधान केले होते. यावरुन विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 8 डिसेंबर रोजी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक विशिष्ट विचारधारा वेळोवेळी कायमच षडयंत्रपूर्वक बदनामी करत आहे. या घटनांचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर एक दिवसीय बंद करण्याबाबत व्यापक चर्चा करून ‘बंदचा’ निर्णय घेण्यात आला आहे.