पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद (फोटो- istockphoto)
पुणे: महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून विविध जलशुद्धीकरण केंद्र, पंपींग स्टेशन, पाण्याच्या टाक्या आदी ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी(दि. ३ एप्रिल ) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा हाेईल, असे महापािलकेने कळविले आहे.
नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर (केदारेश्वर टाकी, महादेवनगर टाकी, आगम मंदिर टाकी, श्रीहरी टाकी), खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल.आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुगी टाकी परिसर तसेच कोंढवे – धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे या जलकेंद्र, पंपींग स्टेेशन, पाण्याच्या टाक्यातून हाेणारा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार अाहे.
अजित पवारांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी
पुढील पाच दिवसांत वडगाव शेरी परिसरातील पाणीप्रश्न सोडवा; अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिली. पुणे विमानतळ येथे महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वडगाव शेरी परिसरातील पाणीटंचाईच्या समस्येबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विमानतळावर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या वेळी पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली. परिसरातील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आदेश त्यांनी या वेळी महापालिकेच्या अधिकार्यांना दिले. यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप, एकनाथ गाडेकर, माऊली कळमकर, बापू कळमकर आदी उपस्थित होते.
अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे, मात्र हा अहवाल खोटा असून नागरिकांना पाण्याची समस्याच ही भेडसावतच आहे. असा गंभीर आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज खराडीत केला.