फोटो- संग्रहित
बदलापूर येथील शाळेत चार वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आज जवळपास १२ तास आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच पुण्यात देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पुण्याच्या भवानी पेठ भागातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा घटना घडली आहे. अशा घटना सातत्याने घडत असल्याने पालकांच्या मनात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीत शिकत असल्याचे समजते आहे. अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोप देखील त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील भवानी पेठेतील शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी त्याच शाळेतील विद्यार्थी असून, १९ वर्षांच्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे आपल्या मुली सुरक्षित नसल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अल्पवयीन मुलगी आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती. यावेळेस आरोपी तरुण मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता.पीडित मुलगी जवळ येताच त्याने तिचा हात पकडून तिला स्वच्छतागृहात नेले. त्या ठिकाणी तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले. यावेळेस पीडित मुलीने कसाबसा आपला हात सोडवून तिथून पळ काढला. घरी गेल्यानंतर मुलीने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात १९ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक देखील करण्यात आली आहे.