फोटो सौजन्य - Social Media
वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे वयाबद्दल काळजी करण्याऐवजी या टप्प्यावर आरोग्य कसं उत्तम ठेवता येईल, याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरतं. विशेषतः पन्नाशीच्या दशकात प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी हे अधिक गरजेचं आहे. या काळात होणारे हार्मोनल बदल शरीरावर उलट परिणाम करू शकतात. मात्र काही साध्या आणि सोप्या सवयी दिनचर्येत समाविष्ट केल्या, तर आरोग्य उत्तम ठेवत आयुष्य अधिक आनंदी आणि निरोगी बनवता येतं.
झोपेची काळजी घ्या
पन्नाशीनंतर बहुतेक स्त्रियांना झोप न लागणं किंवा इन्सोम्नियाची समस्या भेडसावते. प्री-मेनोपॉज आणि मेनोपॉजच्या काळात होणारे हार्मोनल बदल हे यामागचं प्रमुख कारण असतं. रात्री गरम होणं, घाम येणं हे लक्षणं झोप बिघडवतात. म्हणूनच झोपण्यापूर्वी अल्कोहोलयुक्त पेय घेणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
प्रोटीनयुक्त आहार घ्या
या वयानंतर शरीरातील मसल मास झपाट्याने कमी होतो. इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी घटल्यामुळे हाडांची घनता आणि स्नायूंची ताकद कमी होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी प्रोटीनयुक्त स्नॅक घेणं फायदेशीर ठरतं. पनीर, डाळी किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन स्मूदी उत्तम पर्याय ठरू शकतात. यासोबत स्नायूंना बळकट करणारे व्यायाम अधिक परिणामकारक ठरतात.
दातांची स्वच्छता विसरू नका
या वयात ड्राय माउथ, दातांची झीज, मसूड्यांचे आजार आणि ओरल कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी ब्रश करणं अधिक गरजेचं ठरतं. दात निरोगी राहिल्यास आहारातून मिळणारे पोषक घटक शरीराला अधिक प्रभावीपणे मिळू शकतात.
पाण्याचं सेवन करा
रात्री घाम येणं आणि डिहायड्रेशन हीसुद्धा सामान्य समस्या आहे. त्यामुळे झोपताना साईड टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवणं आवश्यक आहे. वेळेवर पाणी प्यायल्याने गळा कोरडा होणं टळतं आणि हॉट फ्लॅशेसची शक्यता कमी होते.
गंभीर श्वसनाचा सराव करा
शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी पोटातून घेतलेला खोल श्वास खूप उपयुक्त ठरतो. या प्रक्रियेमुळे नर्व्हस सिस्टीम रिलॅक्स होते, झोप सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ताण कमी होतो. झोपण्यापूर्वी डीप ब्रीदिंगचा सराव केल्याने स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलची पातळी घटते. या छोट्या-छोट्या सवयी अंगीकारल्यास महिलांना पन्नाशीचं दशकही निरोगी, ऊर्जावान आणि समाधानकारकरीत्या जगता येईल.