फोटो- आमदार संजय जगताप (ट्विटर)
पुरंदर: पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी आयोजित केलेल्या आमसभेच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्याच्या प्रश्नांबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. परंतु आमसभा असल्याने नंतर बैठक घ्यावी अशी विनंती करून देखील मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यामुळे आपला हक्कभंग झाल्याची तक्रार करून आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अवमान याचिका केली होती. मात्र नार्वेकर यांनी आमदार जगताप यांची याचिका फेटाळून लावल्याने आमदार संजय जगताप यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या कोर्टात धाव घेतली आहे.
याबाबत आमदार संजय जगताप यांनी सांगितले कि,२४ जुलै रोजी पुरंदरची आमसभा घेण्यात येणार होती. याबाबत १५ जुलै रोजी सर्वांना नोटीस दिली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दिवशी माजी आमदार विजय शिवतारे यांच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक मीटिंग बोलावली. मला माहिती मिळाल्यावर लगेच संपर्क करून आमसभा असल्याने येता येणार नाही तरी नंतर मिटिंग घ्यावी अशी विनंती केली. मात्र मला डावलून माजी आमदारांसोबत मिटिंग घेतली.
वास्तविक पाहता पुरंदरच्या प्रश्नावर मिटिंग घेताना मी विद्यमान आमदार असल्याने माझी उपस्थिती आवश्यक होती. मात्र मला डावलून घेतलेल्या मिटिंगमुळे माझा अवमान आहे. मात्र मी विनंती करूनही मुख्यमंत्र्यांनी माझ्या अधिकारांचा हक्कभंग केला असून हा माझा अवमान आहे. असा आरोप करून विधान सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली होती. यावर विशेष अधिकार कायदा भंग समितीसमोर सुनावणी होवून न्याय मिळेल अशी अपेक्षा आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केली होती.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याची तक्रार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे अर्ज केला होता परंतु विधानसभा अध्यक्ष यांनी सदर याचिका फेटाळली असून याविरोधात आज राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांची भेट घेत कारवाई संदर्भात निवेदन दिले…!… pic.twitter.com/tFSxEEvPPD
— Sanjay Chandukaka Jagtap (@sanjaycjagtap) September 24, 2024
राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुण्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी विशेषाधिकार आणि अवमानाबाबत कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे. तसेच योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. एकूणच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याचिका फेटाळल्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन काय निर्णय देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.