रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश
पुणे: रवीन्द्र धंगेकर हे तरूण वयात शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक बनले आणि दहा वर्षे ते बाळासाहेब ठाकरेंसोबत राहिले. जेंव्हा बाळासाहेबांची साथ सोडून राज ठाकरे बाहेर पडले तेंव्हा धंगेकर हे मनसेत गेले. तिथून ते पुणे मनपाचे नगरसेवक बनले. 2009 व 2014 ची विधानसबेची निवडणूक धंगेकरांनी इंजिनावर ,कसाबा पेठ विधानसभा मतदारसंघातून, लढवली. पण गिरीश बापटांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.
मग ते मनसे सोडून बाहेर पडले आणि कसब्यातून पुणे महापालिकेत अपक्ष म्हणून दाखल झाले. तिथे त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. नंतर ते रीतसर काँग्रेसमध्ये दखलही झाले. 2017 ते आता पर्यंत काँग्रेसमध्ये राहिलेल्या धंगेकरांनी पुन्हा एकदा धनुष्य बाण हाती घेतला आहे. पण ते या वेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात दाखल होत आहेत.
धंगेकरांनी या आधी दर आठ दहा वर्षांनी पक्षांतरे केली आहेत. ते आता चौथ्या पक्षात येत आहेत. इथे ते काय करतात, किती टिकतात याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले असेल. गिरीश बापट यांनी लोकसभा लढवल्या नंतर त्यांच्या जागी पक्षाने 2019 मध्ये मुक्ता टिळक यांना संधी दिली. दुर्दैवाने टिळकताई दुर्धर आजाराला बळी पडल्या. त्यांच्या रिक्त जागेसाठी पोट निवडणूक लागली तेंव्हा भाजपाने टिळक व बापट कुटंबियांना डावलून हेमंत रासनेंना संधी दिली. बापट टिळकांच्या समर्थकांना ते आवडले नव्हते, हे कसबा विधासनभा पोट निवडणुकीच्या निकालाने दिसले.
ती पोट निवडणूक जिंकून धंगेकर हे काँग्रेससाठी मोठेच हीरो ठरले. कारण 1995 पासूनची 28 वर्षांची भाजपाची सलग विजयी मालिका धंगेकरांनी तोडून दाखवली होती. सहाजिकच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गाडगिळांना डावलून काँग्रेस श्रेष्ठींनी धंगेकरांना लढण्याची संधी दिली. पण मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा पराभव करणे ही धंगेकर व काँग्रेसाठी अवघड गोष्ट ठरली. पुढे सहा महिन्यांनी झालेल्या कसबा विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीतही धंगेकरांनी हाताच्या चिन्हावर तिकीट मिळवले. पण भाजपाच्या हेमंत रासनेंनी 90 हजार मते घेतली. धंगेकरांना सत्तर हजार मतांवरच समाधान मानावे लागले.
पुणे लोकसभा निवडणुकीत रवीन्द्र धंगेकरांचा पराभव जवळपास सव्वा लाखांच् फरकाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला. त्या निवडणुकीत धंगेकरांनी हवा मात्र जोरदार तयार केली होती. काँग्रेसची मते 2019 च्या निवडणुकीच्या मानाने 12 टक्क्यांनी वाढली खरी, पण धंगेकरांच्या कसबा मतदार संघातही आघाडी घेता आली नाही. अर्थात 2019 च्या निवडणुकीत मोहन जोशींचा पराभव तब्बल 3.24 लाखांच्या फरकाने कै. गिरीश बापटांनी केला होता. त्या मानाने धंगेकरांच्या पराभवाचे कौतुकच करावे लागेल…!
भाजपमध्ये डाळ शिजली नाही?
राजकीय वर्तुळात अशाही चर्चा रंगलेल्या होत्या की लोकसभेत पराभूत झाल्या पासूनच धंगेकर हे नव्या घराच्या शोधात होते. काँग्रेसमध्ये आपल्याला फारसा वाव नाही किंवा या पक्षालाच राज्यात फारसे भवितव्य नाही, असे त्यांच्या ध्यानात आले असावे. विधानसभा निवडणुकी आधीही त्यांनी देवेन्द्र फडणवीसांचे दरवाजे ठोठावले होते. पण तिथे त्यांची डाळ शिजली नाही. असे म्हणतात की फडणवीसांनी त्यांना सुनावेल की तुम्ही तर तीन वेळा आमच्या पक्ष उमेदवारांच्या विरोधातच लढला आहात. तुम्हाला आम्ही कसब्यातून संधी देऊच शकत नाही. मग धंगेकर एकनाथ शिंदेंकडे गेले पण तिथे विधानसभा निवडणुकी आधी संधी मिळाली नाही. आता, फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर नाराज शिंदे शिवसेनेचा विस्तार कऱण्याचा आणखी प्रयत्न करत असताना धंगेकर हे सत्तारूढ माहायुतीत दाखल होतील. ज्या हेमंत रासने व मुरलीधर अण्णा मोहोळांच्या विरोधात धंगेकर पुण्याच्या राजकारणात आजवर लढले त्यांच्याशीच आता जुळवून घ्यावे लागणार आहे.