बालगुन्हेगारीत देशात महाराष्ट्र पहिला (File Photo)
सोळावं वरीस धोक्याचं असं प्रेमात पडणाऱ्या तरुणांसाठी गमतीनं वापरलं जायचं. पण हेच वय आता गुन्हेगारी जगतात शिरणाऱ्या मुलांसाठी धोक्याचं ठरू लागलं आहे. वर्षभरात देशात बालगुन्हेगारीच्या 36 हजार घटना घडल्या. त्यात देशात सर्वाधिक म्हणजे 5280 गुन्हे एकट्या महाराष्ट्रात घडले आहेत. गंभीर म्हणजे, यात गुंतलेले 80 टक्के बालगुन्हेगार हे 16 ते 18 वर्ष वयोगटातील आहेत.
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने नुकताच 2023 या वर्षातील गुन्हेगारीचा लेखाजोखा प्रसिद्ध केला. त्यातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले. एकीकडे 100 टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी शासनस्तरावरून मोहिमा आखल्या जात आहेत, तर शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’सारख्या घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे हजारो मुले शाळा सोडून गुन्हेगारीत गुरफटत चालल्याचे भयावह वास्तव या अहवालातून पुढे आले आहे.
हेदेखील वाचा : Bhivandi : भिवंडीतील संतापजनक प्रकार! फी न भरल्याने विद्यार्थ्याला जमिनीवर बसवले; मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
एनसीआरबीच्या या अहवालानुसार वर्षभरात 28 राज्यांमध्ये एकंदर 36 हजार 103 बालकांकडून गुन्हेगारी घटना घडल्या. त्यात बिहारसारख्या राज्यालाही मागे टाकत महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हे घडले आहेत. महाराष्ट्रातील या बालगुन्हेगारीच्या घटनांची संख्या 5 हजार 280 इतकी मोठी आहे. ती बिहारमधील बालगुन्हेगारीपेक्षा दुप्पट असून, सामान्य माणसाचे डोळे विस्फारणारी आहे.
आई-वडिल हयात असताना गुन्हेगारी
विशेष म्हणजे, या बालगुन्हेगारांमध्ये अनाथ मुलांपेक्षा आई-वडील हयात असलेल्या राहणाऱ्या मुलांची संख्या बरीच मोठी आहे. यातील ४९३५ बालगुन्हेगार हे आपल्या आईवडिलांसोबत राहणारे होते, असे पोलिसांच्या कारवाईत स्पष्ट झाले. तर आईवडील हयात नसल्याने इतर नातेवाईकांसोबत बालगुन्हेगारांची संख्या केवळ ३४४ एवढी कमी आहे, तर अनाथ असलेला केवळ १ बालगुन्हेगार पोलिसांना आढळला.
शिक्षण सुटताच गुन्हेगारीकडे पाऊल
शिक्षण सुटलेली मुले जशी गुन्हेगारीत गुंतली आहेत, तशीच दहावी-बारावीमध्ये शिकणारी मुलेही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या मार्गावर भरकटलेली आहेत. उलट, एकंदर बालगुन्हेगारांमध्ये १६ ते १८ या वयोगटातील मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे हा अहवाल सांगतो. त्यामुळे शाळेत जाणारी आपली मुले नेमके काय करतात, याबाबत पालकांनी लक्ष द्यावे.
5280 बालगुन्हेगारीच्या घटना
राज्यात वर्षभरात 5280 बालगुन्हेगारीच्या घटना घडल्या. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. इतर राज्यात घडलेल्या बालगुन्हेगारीच्या घटना पुढीलप्रमाणे आहेत. आधप्रदेश- २०१, अरुणाचल प्रदेश ३४, आसाम १४६, बिहार २४५७, छत्तीसगड-२१६१, गोवा-४३, गुजरात- १९९९ हरियाणा- १९८६, हिमाचल प्रदेश २४४. झारखंड-१९०, कर्नाटक-१०७२, केरळ-७८९, मध्य प्रदेश-४३३०, मणिपूर- २५, मेघालय-८८. मिझोराम- १९, नागालैंड- १०, ओडिशा-१५०७, पंजाब-६८३, राजस्थान- ३८९८, सिक्कीम-१५ तामिळनाडू ३८११, तेलंगण्ड- १४६७. त्रिपुरा-३३. उत्तरप्रदेश-१८२२, उत्तराखंड १६८, पश्चिम बंगाल-९२५.