पुणे जिल्हा बँकेच्या एलटीएसबी बाँडची विक्रमी विक्री; निर्धारित वेळेआधीच 500 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण (संग्रहित फोटो)
बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एलटीएसबी बाँडच्या विक्रीत विक्रमी कामगिरी करत निर्धारित मुदतीपूर्वीच ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या इतिहासात इतक्या अल्प कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बाँड विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एकमेव जिल्हा बँक असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ जुलै रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एलटीएसबी व पीडीआय बाँडच्या विक्रीचा शुभारंभ राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते करण्यात आला होता.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या परवानगीनुसार तसेच पुणे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांना वैधानिक तरलता प्रमाण एस एल आर राखण्यासाठी करावयाच्या एकूण ठेवींच्या किमान २५ टक्के गुंतवणुकीपैकी ५ टक्के गुंतवणूक बँकेच्या बाँडमध्ये करण्यास राज्य शासनाने दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर या बाँडची विक्री करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५२३ कोटींच्या कर्जमुक्तीची घोषणा; काय म्हणाले मंत्री बाबासाहेब पाटील?
दहा वर्षांच्या कालावधीसाठी किमान १० हजार रुपयांची गुंतवणूक, ८.५० टक्के आकर्षक व्याजदर आणि दर तीन महिन्यांनी खात्यावर जमा होणारे व्याज ही या बाँडची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, अन्य सहकारी संस्था, ठेवीदार, गुंतवणूकदार आणि सभासदांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास यामुळेच निर्धारित वेळेपूर्वी हे उद्दिष्ट साध्य करता आल्याचे दुर्गाडे यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकारमंत्री आमदार दिलीपराव वळसे-पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्याचबरोबर बँकेचे सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे बाँड विक्रीचे उद्दिष्ट वेळेआधी पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवी १७,१८९ कोटी रुपये असून एकूण उलाढाल ३०,७६७ कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील २९४ शाखांच्या माध्यमातून बँकेने १३,५७८ कोटी रुपयांचे विविध प्रकारचे कर्ज वितरित केले आहे. बँकेला ४६१.३४ कोटी रुपयांचा ढोबळ नफा तर ७८.७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली असून, याच विश्वासाच्या बळावर एलटीएसबी बाँडच्या विक्रीत विक्रमी कामगिरी करत ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करता आले, असे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

