संग्रहित फोटो
अजित पवार यांच्या निधनानंतरची सोमेश्वर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची ठरली होती. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केले, तर युगेंद्र पवार यांनीही स्वतंत्र पॅनलची घोषणा केली. त्यामुळे तिरंगी लढतीत सुनेत्रा पवार यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या निकालाकडे लक्ष लागले होते.
पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा पाठिंबा होता. पुरंदरमधील चार उमेदवारही त्यांच्या पॅनलमधून रिंगणात होते. दुसरीकडे, राष्ट्रवादीला शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, खंडाळ्याचे मंत्री मकरंद पाटील आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्या राजकीय समीकरणांचा फायदा मिळाला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांमधील संपर्क आणि संघटनात्मक ताकद राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली.
जगताप यांनी आपल्या पॅनलला अजितदादांचे नाव दिले होते. मात्र, त्यांच्या भूमिकेवर सुनेत्रा पवार यांनी प्रचारसभांमधून प्रश्न उपस्थित केले. कारखाना कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसल्याचे सांगतानाच अजितदादांनी कारखाना कर्जमुक्त केल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. युगेंद्र पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर केलेल्या आरोपांना जय पवार यांनी प्रत्युत्तर दिले. उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत सुनेत्रा पवार यांनी रणनीतीवर भर दिला. नाराजांची समजूत काढण्यात आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले. प्रचारसभांमधील शक्तिप्रदर्शनानेही पक्षाची संघटनात्मक ताकद दाखवून दिली.
पार्थ-जय पवारांचे मनोबल वाढले
उमेदवारांच्या मुलाखती सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी घेतल्या, तर उमेदवार निश्चितीमध्ये खासदार पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा होती. २१ पैकी २१ जागांवरील विजयामुळे पवार कुटुंबातील नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढला आहे.
राष्ट्रवादीचा एकोपा निर्णायक
बारामती तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत काढण्यातही पक्षाला यश आले. अजितदादांनी निर्माण केलेल्या राजकीय पायाचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यापुढे असताना, सोमेश्वरच्या निकालाने त्यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा अधोरेखित केली आहे.






