सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ : वडगाव शहरातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, वडगाव-कातवी शहर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुख्याधिकारी, वडगाव-कातवी नगरपंचायत यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि वडगाव मावळ पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वडगाव मावळ येथे दर गुरुवारी नियमितपणे आठवडे बाजार भरत असून त्या दिवशी शहरासह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि शेतकरी बाजारासाठी येतात. मात्र बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहनांना मुक्त प्रवेश असल्याने नागरिकांना चालणेही कठीण होत असून संपूर्ण परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे.
वडगाव हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे जिल्हा व सत्र न्यायालय, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पोलीस ठाणे, मंडळ अधिकारी कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती, रेल्वे स्थानक तसेच विविध शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये वादविवाद होत असून रुग्णवाहिका व अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याचेही भाजप महिला आघाडीने नमूद केले आहे.
यावर उपाय म्हणून आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारपेठ परिसरात योग्य त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारून चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करावी, वाहतूक नियोजनासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि वाहतूक नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात बिष्णोई गँगची दहशत! फुरसुंगीतील गोळीबारानंतर आणखी एकाला खंडणीसाठी धमकी
प्रशासनाचे दुर्लक्ष
यापूर्वीही या विषयाकडे प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधण्यात आले असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत प्रशासन नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असल्याची टीकाही निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील सात दिवसांच्या आत गुरुवारच्या आठवडे बाजारातील वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप महिला आघाडीने दिला असून, त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.






