संग्रहित फोटो
पुणे : फुरसुंगीतील व्यावसायिकाला ५० कोटींची खंडणी मागितल्यानंतर काही तासांत कार्यालयावर गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून आणखी एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका औषध वितरकाला ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र, पुण्यातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांत नोंद करण्यात आला आहे. हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी भागात ओैषध वितरकाचे दुकान आहे. बिष्णोई टोळीने ओैषध वितरकाला सोशल मिडीयाद्वारे संपर्क साधला. तसेच, धमकावले. त्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना बुधवारी (२४ जून) मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, याप्रकरणात नेमकी काय कारवाई झाली हे समजू शकलेले नाही.
सोमवारी (२२ जून) फुरसुंगीत एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर बिष्णोई टोळीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या व्यावसायिकाकडे आधी ५० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर गोळीबार केला होता. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी अद्याप पसार आहेत. गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेतला जात आहे. ही घटना ताजी असताना हा दुसरा प्रकार घडला.
फुरसुंगी गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मागावर पोलीस
फुरसुंगी प्रकरणातील आरोपींची ओळख पटलेली आहे. तो लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून, तो फुरसुंगीतील कंपनीत कामगार होता. त्याने व्यावसायिकाची माहिती घेऊन त्याच्या व्यवसायाबाबतची माहिती बिष्णोई टोळीला पुरविल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणाचा गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिस तपास करत आहेत. परंतु, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून!
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून आणि त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये दहशतीचे जाळे निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. विशेषत: या टोळीने महाराष्ट्रात व्याप्ती वाढवली असली, तरी त्याची सूत्रे पुण्यातूनच हलविली जात असल्याचे सातत्याने समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे या टोळीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.






