सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळेफाटा : गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी दरवर्षी सुगंधी आणि रंगीबेरंगी नैसर्गिक फुलांची मागणी वाढते. यंदाही गणेशोत्सवासाठी शेतकऱ्यांनी चार महिने कष्ट घेऊन झेंडू, शेवंतीसह विविध फुलांची लागवड केली. मात्र, बाजारपेठेत स्वस्त कृत्रिम व प्लॅस्टिक फुलांचा सुळसुळाट झाल्याने अस्सल फुलांची मागणीच घटली आहे. परिणामी फुलशेतीचा सुगंध बाजारात पोहोचण्याआधीच शेतातच कोमेजू लागला असून, उत्पादकांच्या हातात अपेक्षित उत्पन्नाऐवजी निराशा आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात झेंडूला साधारणपणे ८० ते १०० रुपये, तर शेवंतीला १५० ते १७० रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची अपेक्षा उत्पादकांना असते. यंदा मात्र कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी घटल्याचे उत्पादक सांगतात. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला असून, घाऊक बाजारात झेंडूला अवघे ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने उत्पादकांच्या आर्थिक गणिताचा ताळमेळच बिघडला आहे.
एक एकर झेंडू किंवा शेवंतीच्या लागवडीसाठी सरासरी ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मशागत, रोपे, खते, औषधे, मजुरी, तोडणी आणि वाहतूक असा खर्च वाढत असताना बाजारभाव मात्र घसरल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवसांत फुलांना मोठी मागणी राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र ग्राहक आणि सजावट व्यावसायिक नैसर्गिक फुलांऐवजी टिकाऊ आणि पुन्हा वापरता येणाऱ्या कृत्रिम फुलांकडे वळत असल्याने ताज्या फुलांचा उठाव कमी झाला आहे.
जुन्नर तालुक्यात फुलशेतीचे क्षेत्रही लक्षणीय
झेंडू : ३०९ हेक्टर, अॅस्टर : ५८ हेक्टर, शेवंती : ३ हेक्टर, निशिगंध : ५.४० हेक्टर, गुलाब : ५.४० हेक्टर या क्षेत्रावर अनेक शेतकरी आणि मजुरांचे उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराचा परिणाम केवळ उत्पादकांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण फुलांच्या बाजारपेठेवर होत असल्याचे चित्र आहे. फुलांची तोडणी केल्यानंतर ती बाजारात नेण्यासाठी वाहतूक खर्च होतो. बाजारात मागणी आणि दर नसतील तर तोडणी, पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे काही उत्पादकांना फुले बाजारात नेण्यापेक्षा शेतातच सोडून देण्याची वेळ येत असल्याचे सांगितले जाते. गणपतीसाठी चार महिने कष्ट करून झेंडू, शेवंती फुलवली. मात्र बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांचा सुळसुळाट असल्याने आमच्या ताज्या फुलांना मागणी नाही. सरकारने प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर प्रभावीपणे कारवाई केली नाही, तर फुलशेती करणेच कठीण होईल,”अशी भावना फूल उत्पादक गणेश गडगे यांनी व्यक्त केली.
बाप्पाच्या सजावटीत अस्सल फुलांना जागा कुठे?’
गणेशोत्सवात घरगुती सजावट असो वा सार्वजनिक मंडळांची आरास, फुलांना पारंपरिक महत्त्व आहे. मात्र कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी कमी होत असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. एका बाजूला शेतकरी पाणी, श्रम आणि पैसा खर्च करून जिवंत फुले फुलवतो; तर दुसऱ्या बाजूला काही मिनिटांत तयार झालेली कृत्रिम फुले बाजारात दीर्घकाळ टिकतात. या स्पर्धेत नैसर्गिक फुलांचा उत्पादक मात्र दराच्या कोंडीत सापडला आहे. कृत्रिम फुलांच्या विक्रीबाबत असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, बाजारपेठेतील विक्रीवर नियंत्रण ठेवावे आणि नैसर्गिक फूल उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.






