Photo - X
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तिघेजण सुखरूप बचावल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक जवळपास दोन तास विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या फॉर्च्युनर कारने समोरील भाजीपाल्याने भरलेल्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तुषार भूमकर हे पुण्यातील वाकड परिसरातील रहिवासी होते. ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक उपक्रम, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील युवकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार’; लक्ष्मण हाकेंच्या इशाऱ्यावर प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे देवदूत पथक आणि स्थानिक मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वेग, वाहनांमधील अंतर आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास महामार्ग पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तुषार भूमकर यांच्या निधनामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






