वनराज आंदेकर (फोटो- टीम नवराष्ट्र)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काल रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. उपचारादरम्यान वनराज आंदेकर यांच्या मृत्यू झाला आहे. मात्र या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. वनराज आंदेकर प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना अटक केली आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणी आणि मेहुण्यांनी संपत्तीच्या वादातून हा खून केल्याची माहिती आहे. गेले अनेक दिवस त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते.
पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या बहिणींना अटक केली आहे. गेले अनेक दिवस वनराज आणि त्याच्या बहिणींमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. याच वादातून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. रविवारी रात्रीच्या साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते नानापेठ परिसरात काही कामासाठी उभे होते. त्यावेळी काहीजण त्याठिकाणी आले, त्यांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला, कोयत्याने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून फरारही झाले.
हेही वाचा: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदेकर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी त्यांच्या घराच्या आसपासच्या परिसरातील लाईट देखील घालवली होती. त्यातच घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर त्यावेळी एकटेच होते. हीच संधी साधून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले.त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले होते. त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले, या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई होता. त्याचे नाना पेठेतील दुकान अतिक्रमणाच्या कारवाईत महापालिकेने तोडले होते. त्यानंतर आंदेकर कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद सुरु झाला. याप्रकरणी त्याच्या बहिणीने वनराज आंदेकर यांना धमकी देखील दिली होती. अखेर मेहुण्याला आणि लाडक्या बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये माजी नगरसेवकांवर हल्ला करण्यात आला आहे. नाना पेठेमध्ये टू व्हिलरवरुन येऊन वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जवळ असणाऱ्या केईएम रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर फायरिंग करुन लगेच फरार झाले आहेत. दरम्यान आता पोलिसांनी त्यांच्या बहिणींवर अटकेची कारवाई केली आहे.