पुरंदरमध्ये मोठे प्रकल्प होणार (फोटो- टीम नवराष्ट्र)
सासवड: छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन म्हणजे आपल्यासाठी गौरवदिन आहे . त्यांच्या कार्याचा, शौर्याचा इतिहास घराघरात पोहोचण्यासाठी आणि पुढील पिढीला प्रेरणा मिळेल अशा भव्य प्रकल्पाची येत्या तीन, चार महिन्यात मोठ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात येईल. असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे.
किल्ले पुरंदर येथे शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टचेवतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४५ व्या राज्याभिषेक सोहळा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विजय शिवतारे यांनी ज्या ठिकाणी राजांचा जन्म झाला आणि ज्या वाड्यात ते लहानाचे मोठे झाले, त्या परिसरात प्रकल्प उभारण्यात येईल असे सांगितले. सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म स्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या मूर्तीस दही, दुध आणि तीर्थामृताने महाभिषेक घालण्यात आला.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील, संभाजी ब्रिगेडचे संघटक सचिन सावंत, खा. अजयसिंह सावंत, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष संदीप जगताप, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव, तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष हगवणे, सागर जगताप यांच्यासह शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टचे पदाधिकारी आणि शंभूप्रेमी उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भोसले यांना कृषिरत्न, पुणे येथील सोशेल १०० फौंडेशनला सामाजिक, शिरीष देशमुख यांना उद्योजक, कडलास येथील शिवछत्रपती कला क्रीडा मंडळाला क्रीडा आणि आड. सचिन वाघ यांना विशेष सन्मान अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती संभाजीमहाराज यांचा जीवनपट उलगडून त्याच्या कार्याचा गौरव केला. वडकी येथील बाल व्याख्याती प्रांजली गणेश भंडारे हिने छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे उभे करणारा रोमांचकारी इतिहास सांगितला. यानिमित्त ट्रस्टच्या वतीने किल्ल्यावर सनई, चौघड्याच्या निनादात आणि हलगीच्या तालात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. वीरा मल्टीस्पोर्ट अकॅडमी आणि मर्दानी आखाडा पुणे येथील शालेय विद्यार्थ्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे तसेच विविध कवायती अशा चित्तथरारक कसरती करून उपस्थितांची मने जिंकली.
पुरंदर विमानतळाला CM फडणवीसांचा ग्रीन सिग्नल
पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर पर्यंत भूसंपादन करण्याच्या एमआयडीसीला ( महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ) आदेश दिले आहेत. त्याच बरोबर अन्य नियोजनाच्या प्रक्रियाही राबविण्याच्या स्य्चना दिल्या आहेत. साहजिकच इतके दिवस विमानतळ प्रकल्पाचे काय होणार ? या चर्चेवर अखेर पडदा पडला असून येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया वेग घेईल अशी चिन्हे आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होणार असून यासाठी एकूण २८३२ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. माजीमंत्री विजय शिवतारे यांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, विमानतळ प्राधिकरण, संरक्षण मंत्रालय आदींसह सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. प्रकल्पाचा नकाशा तयार करून पूर्ण प्लान तयार करण्यात आला आहे. सरकारच्या उच्चाधिकार समितीने एमआयडीसी अथवा खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी तत्वता मान्यताही दिली होती.