तेल्हारा: गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील प्रमुख असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृह शेवटच्या घटका मोजत आहे. पडक्या इमारतीमध्येच अनेक वर्षांपासून शवविच्छेदन होत आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी मृतदेह उघड्यावर ठेवण्याची वेळ येते. परिणामी शवविच्छेदन गृहच मरण यातना भोगतेय अशी भावना जनमाणसांत निर्माण झाली आहे
[read_also content=”निसर्गाच्या सानिध्यात रंगले गोंड महासभा संमेलन, प्रकृती पुजेसह संस्कृतीचे दर्शन, झाले महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजन https://www.navarashtra.com/maharashtra/gond-mahasabha-sammelan-is-happen-in-the-proximity-to-nature-nraa-263668.html”]
तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालय हे शहराच्या बाहेर असून, त्याला लागूनच शेती आहे. त्यामुळे वन्यजीव, कोल्हे, कुत्रे आदिंकडून मृतदेहाचे लचके तोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी संपूर्ण सुविधायुक्त शवविच्छेदन गृहाची निर्मिती करण्याची मागणी जोर धरीत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याकडे निधीची मागणी केल्यास सुविधायुक्त शवविच्छेदन गृहाची निर्मिती होऊ शकते. निधी उपलब्ध झाल्यास तेल्हारा शवविच्छेदन गृहाला अच्छे दिन येऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
[read_also content=”मध्यप्रदेशातून अकोल्यात येतात देशी कट्टे, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे १०० खबरी सक्रिय https://www.navarashtra.com/maharashtra/from-madhya-pradesh-come-to-akola-with-desi-cuts-100-reports-of-special-team-of-superintendent-of-police-are-active-nraa-263562.html”]
नवीन सुसज्ज शवविच्छेदन गृहाची इमारत का नाही ?
ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात गेल्या दोन वर्षात काही नवीन इमारती व निवासस्थाने यांची बांधकामे झाली आहेत, परंतु शवविच्छेदन गृहाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याच वेळी निधी उपलब्ध केला असता तर शवविच्छेदन गृहाचीही नवी इमारत उभी राहिली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मृतदेहाची होते अवहेलना
अनेकदा मरण पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईक बाहेरगावी असल्याने त्यांना येण्यास विलंब होतो तसेच काही कारणामुळे पोलिस चौकशीस सुद्धा विलंब होतो. शवविच्छेदन गृहाची इमारत ही अत्यंत जीर्ण आणि पूर्णपणे उघडी असल्याने कुणीही आत जाणे येणे करू शकते. अनेकदा मृतदेह जमिनीवर खाली ठेवावा लागतो. शवविच्छेदन गृह हे शेतीला लागून असल्याने वन्यजीव, हिंसक प्राणी कुत्रे हे मृतदेहाचे लचके तोडू शकतात, त्यामुळे मृतदेहाची अवहेलना होते, मृतदेह असुरक्षित राहतो.
[read_also content=”मैत्री कॉम्प्युटरवर रेल्वे पोलिसांचा छापा, रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार केला उघड https://www.navarashtra.com/maharashtra/railway-police-raid-on-maitri-computer-black-market-of-railway-e-tickets-revealed-nraa-263572.html”]
शीतपेट्या गरजेच्या
अनकेदा मृतदेहाचे विच्छेदन करण्यास विलंब होतो, त्यामुळे मृतदेहाला वास येतो. कधीकधी एकापेक्षा अधिक मृतदेह आल्यास अडचणी निर्माण होतात. त्यासाठी खाजगी शीतपेटी आणणेस गोरगरीब जनतेस परवडणारे नाही तसेच, ती वेळेवर उपलब्ध होईलच याचीसुद्धा शाश्वती नसते. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी शीतपेट्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाल्यास समस्या कायमची दूर होईल.
आमदारांकडे निधीची मागणी
मृतदेह ठेवण्यासाठी सुरक्षा नसणे ही बाब गंभीर असून, तातडीने या शवविच्छेदन गृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे – सुनिल राठोड (माजी नगरसेवक, तेल्हारा)