"निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा," संजय निरुपम यांची राहुल गांधीवर टीका
मुंबई : भारतातील निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया एक मजबूत व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा असल्याची घणाघाती टीका शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त करुन नरेटिव्ह करण्याचा गांधी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झालाय. केवळ १६ आमदार निवडून येणे ही काँग्रेसची आजवरची सर्वात मानहानिकारक कामगिरी आहे, मात्र राहुल गांधींना हे पचनी पडत नाही. काँग्रेस आणि मतदारांमधील संबंध तुटलेला आहे. मतदारांना काय हवंय याची राहुल यांना जाणीव नसल्याने ते वारंवार पराभूत होत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. राहुल गांधींचा प्रत्येक आठवड्यात असेच वायफळ बोलतात. रविवारी ते आराम करतात. सोमवारी त्यांना विरोधी पक्ष नेता असल्याची त्यांना जाणीव होते, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करता. मंगळवारी राहुल गांधींना काँग्रेस पक्षाची आठवण होते, पक्षाचा अध्यक्ष नसून देखील पक्षातील नेत्यांना धाक दाखवतात.
बुधवारी राहुल यांना काँग्रेसच्या विचारधारेची आठवण होते आणि ते आरएसएसवर टीका करतात. गुरुवारी त्यांना ओबीसी समाजाची आठवण येते ते जातनिहाय जनगणनेविषयी बोलतात. शुक्रवारी ते हिंदुत्वविरोधी भूमिका घेतात. ते हिंदूचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकारांवर टीका करतात. या भूमिकेमुळे डावे पक्ष राहुल गांधींचे कौतुक करतात. शनिवारी राहुल गांधी निवडणूक आयोगावर टीका करतात. हरियाणा, महाराष्ट्रात निवडणुकीत झालेल्या पराभवाचे रडगाणे ते पुन्हा गातात, अशी खरमरीत टीका निरुपम यांनी यावेळी केली.
बिहारमधील जनतेला काँग्रेस काय देणार यावर गांधी यांनी बोललं पाहिजे, मात्र तसे न करता महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर ते पुन्हा पुन्हा संशय घेत आहेत. निवडणूक आयुक्ताची निवड ही एका समितीच्या माध्यमातून केली जाते. काँग्रेस सत्तेत असताना तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांच्या मर्जीतील लोकांना निवडणूक आयुक्त केले होते, असे निरुपम म्हणाले. महाराष्ट्रातील वाढीव मतदान, वाढलेले मतदार आणि मतदार यादी संदर्भात राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने सविस्तर लेखी दिलेले आहे, मात्र हे सत्य स्वीकारण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असे ते म्हणाले.
लोकसभेत नागपूरमधील कामटी लोकसभा, सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघात शेवटच्या तासांत मतदान वाढले, तिथे शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले. नाशिकमधील वणी मतदार संघात उबाठाचे उमेदवार जिंकले. श्रीरामपूरमध्ये शेवटच्या तासांत १२ टक्के मतदान वाढले तिथे काँग्रेसचा उमेदवार जिंकला. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत, असे निरुपम म्हणाले.