रेल्वे दुर्घटनेवर शरद पवारांचे भाष्य (फोटो - सोशल मिडीया)
Local Train Accident: ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. मात्र आता यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिवा- मुंब्रा लोकल दुर्घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ठाणे रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्याद हेही मृत्यूमुखी पडले आहेत. धावत्या लोकलमधून १० ते १२ जण खाली पडल्याने सकाळी हा दुर्दैवी अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि अनेक प्रवासी दारांवर लटकून प्रवास करत होते.
मुंब्रा-दिवा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना शरद पवार म्हणाले, “मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.”
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2025
पुढे बोलताना पवार म्हणाले, “मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही.”
“केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे,” असे शरद पवार म्हणाले.