संग्रहित फोटो
नंदुरबार : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी दुपारी 2 वाजता महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यानंतर 13 मार्चला धुळे, मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्चला पालघर, ठाणे मार्गे ही यात्रा 16 मार्चला मुंबईत पोहोचेल. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी शिवाजी पार्क येथे होणार आहे.
या यात्रेसाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसने या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत ही मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीतील इतर घटकपक्षदेखील काँग्रेसच्या या यात्रेत सहभागी होणार आहेत.
110 लोकसभा मतदारसंघांचा दौरा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 15 जानेवारीला मणिपूर येथून सुरू झाली असून, ती मुंबईत संपत आहे. हा प्रवास 15 राज्ये, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून 6700 किलोमीटरचे अंतर कापून 67 दिवसांत मुंबईत पोहोचत आहे. भाजपने या यात्रेत अडथळे आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण ती अव्याहत सुरूच आहे. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचे मुंबईत भव्य स्वागत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.






