"माझ्या हत्येचा कट रचला जातोय...", Mamata Banerjee यांचा भाजपवर खळबळजनक आरोप (Photo Credit- X)
ममता बॅनर्जी यांनी भाषणादरम्यान त्यांच्या जुन्या जखमा आणि प्रकृतीवरून भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खरपूस समाचार घेतला. “मी मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा उभी राहिली आहे. माझ्या जखमेबद्दल कोणाला शंका असेल, तर त्यांनी डॉक्टरांचा अहवाल तपासावा. निवडणुकीच्या काळात मला जाणूनबुजून जखमी करण्याचा कट आखण्यात आला होता. तरीही मी व्हीलचेयरवर बसून प्रचार केला,” असे त्या म्हणाल्या. भाजपच्या विधानांमधून दंग्यांसारखा एखादा नवा कट रचला जात असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी SIR (Special Intensive Revision) च्या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा साधला. राज्यातील सुमारे १ कोटी २० लाख लोकांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “या लोकांच्या हक्कासाठी मी रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देईन. गरज पडल्यास पीडितांना मोफत कायदेशीर मदतही दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भाजपचे चाणक्य उतरणार मैदानात; ममता बॅनर्जींविरोधात दाखल करणार खळबळजनक चार्जशीट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जे लोक दंगलींच्या माध्यमातून सत्तेवर आले, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये.” त्यांनी यावेळी गुजरात दंगलींचा संदर्भ देत भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, महागाई आणि निवडणुकीच्या काळात भाजपकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांवरूनही त्यांनी जोरदार प्रहार केला.
डाव्या पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या लोकसंख्येची रचना बदलल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. “विपक्ष इतिहास आणि समाजाबद्दल अज्ञान पसरवत असून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Elections 2026 : तामिळनाडू-बंगालमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान; डाव्या पक्षांना देऊ शकणार का मात?






