उद्धव ठाकरेंचे नाव टाळल्याने Ambadas Danve कडाडले! (Photo Credit- X)
पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयावरून भाजप आणि शिवसेना उबाठामध्ये हा राडा झाला. यावर दानवे म्हणाले, या पाणी योजनेची प्रशासकीय मान्यता २०१९ साली मिळाली असली तरी याचे टेंडर आणि भूमिपूजन आणि कामाला सुरुवात उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झाली होती हे लक्षात घेतले पाहिजे. उद्धव ठाकरेंचे नाव न घेणे हा भाजपचा कोतेपणा आहे. या अभिनंदन ठरावात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचेही नाव यायला हवे होते. शहराचे नामांतरातही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची प्रमुख भूमिका होती मात्र यातही त्यांना श्रेय दिले गेले नाही. जर भाजपचे असेच काम सुरु राहिले तर शिवसेनेचे सर्व नगरसेवक याला पुरून उरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
दानवे यांनी शहरातील गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावरही भाष्य केले. ते म्हणाले, घरगुती गॅसचा काळाबाजार सुरु आहे. काल आम्ही उघडकीस आणलेल्या गॅसच्या काळाबाजाराविषयी गुन्हा दाखल करायला आठ तास लागले. पुरवठा विभाग आणि पोलीस हे एकमेकांवर टालमटोल करत होते. अखेरीस गुन्हा दाखल झाला. एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे. एजन्सींनी ग्राहकांना घरपोच सिलेंडर द्यावे, कोणालाही एजन्सीवर बोलवू नये, अशी मागणीही केली आहे.
गॅस पेट्रोलची टंचाई नाही असे सांगितले जात असले तर मग इतकी गर्दी का होतेय. गॅससाठी अतिरिक्त दर आकारले जात आहेत, मात्र अशा एजन्सींना धडा शिकवण्याचे काम शिवसेना करणार आहे. आम्ही हे काम काल केले. यात निश्चितच फरक पडेल, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. नागरिकांनी पावतीखेरीज एक रुपयाही अतिरिक्त देऊ नये, असे आवाहन केले.
अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा दिला आहे. यात माझा काहीही संबंध नसल्याचा दावा चाकणकरांनी केला आहे. यावर बोलताना दानवे म्हणाले, चाकणकरांना पदाचा आणि पक्षाचा राजीनामा द्यावा लागला, यामुळे यात त्यांचा सहभाग स्पष्टपणे दिसतो. पोलीस तपासात सर्व समोर येईलच. यात जो गुन्हेगार असेल त्याला कायद्याच्या कचाट्यात घेतले पाहिजे. मात्र हा प्रकार आर्थिक व्यवहाराचा नाही. ज्या पद्धतीने महिलांना वागणूक दिली गेली हा मुख्य मुद्दा आहे. अशा व्यक्तीसोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसतात. इतके सोबत असूनही सदरील प्रकरणाची कुणकुणही लागू नये असे शक्य नाही. खरात यांच्या दुष्कृत्यात त्याही सहभागी असल्याचा संशय आहे.






