OBC अध्यक्षपदाचा राहुल पिंगळेंचा राजीनामा, ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा
ठाणे : काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार, नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक दुसऱ्या फळीतील काँगेस कार्यकर्त्यांची सक्षम फौज भविष्यात तयार करता यावी, यासाठी ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांच्या पदाचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांना यांच्याकडे सुपूर्द केला.
काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखला जाणारा मध्यमवर्गीय चेहरा अशी पिंगळे यांची ओळख आहे.त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात ओबीसींच्या विविध प्रश्नांवर रॅली, सह्यांच्या मोहीमा, विविध आंदोलने यांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करत पक्षाचे संघटनात्मक जाळे देखील विस्तारण्याचे काम केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणनेचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. राहुल गांधी यांच्या मागणीमुळे सर्व बाजूंनी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याने अखेर केंद्रातील भाजप सरकारला जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या लढ्यावेळी मला ओबीसी विभागाच्या माध्यमातून ठाणे शहरात जातनिहाय जनगणनेचा मुद्द्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून या लढ्याचा भाग होत राहुलजींचे हात बळकट करता आले याचा आनंद आहे.
पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यांनी पदे रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेस ने पारित केलेल्या ठरावानुसार, नैतिकदृष्ट्या माझ्या पदाचा राजीनामा देत एक आदर्श घालून दिला आहे. पक्षातील इतर लोकांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी, केवळ एकाच व्यक्तीने पाच पाच वर्षे खुर्चीला चिकटून रहाणे हे मला पक्षाचा नियमानुसार अयोग्य वाटते. उदयोन्मुख तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आपण मोठ मन करून संधी दिली, तर आणी तरच काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल असे राहुलजी गांधी यांच्या प्रमाणे माझेही प्रांजळ मत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.