मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा (फोटो- सोशल मिडिया)
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. धनगर आरक्षण, २९ ऑगस्टचे आंदोलन, पहलगाम हल्ला आणि भारत -पाकिस्तान यांच्यातील सबंध याच्यावर भाष्य केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “काही लोक जातिवाद करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या जातीच्या मुलीना मोफत शिक्षण मिळावे ही आम्ही मागणी केली. गेले ७० वर्षे आम्ही लढा देत आहोत. मराठ्यांच्या आंदोलनामुळे सर्व जातीच्या मुलींना मोफत शिक्षण मिळालं, अस इतर जातीच्या मुलींना ही वाटलं पाहिजे.”
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आदिवासी लोकांचे आरक्षण काढून धनगर समाजाला द्यावे असे आम्ही म्हणत नाही. पण धनगर समाजाने ही आदिवासी असल्याचं पुरावे दिले. त्यांची मुले डोंगर, दऱ्यात फिरतात. म्हणूनच त्यान देखील त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही मागणी केली आहे. मात्र हे फक्त ओबीसी ओबीसी करत आहेत. त्यांना आरक्षण मिळावे असे कुठे हे म्हणत आहेत?”
“२९ ऑगस्टच्या आधी यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होईल. समाजातील लोक आपल्या मुलांच्या हक्कासाठी मुंबईत येतील. काही लोक २० ते २२ दिवस त्या ठिकाणी तयारी करून येतील. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुंबईत यावे असे माझे समाजाला आवाहन आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले.
पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आतापर्यंत दहशतवाद्यांना मारून टाकायला हवे होते. हे तर नुसती विमाने पळवत आहेत. पाणी बंद केले म्हणतात. कुठे पाणी बंद केले आहे? मोदी सरकार फक्त विमाने पळवत आहेत आणि डिझेल वाया घालवत आहेत. सगळं देश सरकारच्या मागे उभा आहे. मात्र हे काहीच करत नाही. अटल बिहारी वाजपेयी यांना सर्व घाबरत होते, मोदींना कुणी घाबरत नाही, हे नुसतं लाडक्या बहिणी सारख फसवत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचा दरारा होता, यांना कुणी भीत नाही.