थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला
गुरुवारी सकाळी शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर, कामगार व नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्यात तीव कंपन जाणवू लागले. काही क्षणांतच बोगद्याच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत स्थानिक तरुणांनी तत्काळ बोगद्याचा मार्ग बंद करून काटेरी कुंपण उभारले व पोलिस तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आयआरबी प्रशासनाला घटनेची माहिती दिली. घटनेनंतर बराच वेळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
आयआरबीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह घटनेनंतर आयआरबी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, केवळ तात्पुरती डागडुजी करून त्यांनी काढता पाय घेतला, असा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने संताप अधिकच वाढला आहे. “वेळीच हा प्रकार लक्षात आला नसता, तर मोठी दुर्घटना अटळ होती,” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. हा बोगदा शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, शेतमजूर, कामगार व नोकरदार वर्गासाठी रोजच्या ये-जा करण्याचा मुख्य मार्ग असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणावेळी सन २०१३ मध्ये स्थानिक नागरिकांची मागणी नसतानाही आयआरबी कंपनीने मनमानी पद्धतीने येथे बोगदे उभारले होते. त्या काळातच या बोगद्यांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. आज स्लॅब कोसळल्याने त्या वेळच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाण पुलावरून सातत्याने मोठ्या वेगाने वाहने धावत असल्याने बोगद्याला कायम धक्के जाणवत आहेत. अशा स्थितीत हा बोगदा तसेच संपूर्ण उड्डाण पूल अत्यंत धोकादायक बनला असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.






