Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी
केंद्र सरकारच्या अमृत दोनधील माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धनाचे काम सुरू आहे. या कच्च्या निविदेत त्यामध्ये २००० ट्रक माती (गाळ) तळ्यातून काढून दोन किलोमीटर पर्यंत ट्रान्सपोर्ट करायचा आयटम टेंडरमध्ये दिलेला आहे. ठेकेदाराला याची पूर्ण माहिती असून देखील मागच्या वर्षी थोडाफार गाळ काढून, घोड्याने पांडे प्ले ग्राउंड परिसरात वाहून नेला. मात्र बहुतांश गाळ काढलाच नाही आणि निधी लाटण्यात येत आहे. तो गाळ काढून त्याने दोन किलोमीटर पर्यंत वाहून न्यायचा आहे. हा गाळ भविष्यात माथेरान शहरातील रस्त्यांचे कामासाठी वापरली जावीत यासाठी सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. सुप्रीम कोर्टाने क्लेपेवरचे रस्ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्याच कामाला मंजुरी दिलेली आहे. त्यापुढील रस्ते पारंपारिक पद्धतीने करायचे आहेत.
खेडकर यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराने माती काढण्याचे काम टेंडरप्रमाणे केले नाही तर ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, असे ठरले आहे. गाळ काढायसाठी गेट उघडून देणे म्हणजे भ्रष्टाचाराला साथ देणे असा आरोप मनोज खेडकर यांनी केला आहे. पालिकेचे सर्वसाधारण सभेत देखील शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम टेंडरप्रमाणे ठेकेदाराकडून सर्व गाळ काढून घेतला जावा, कोणत्याही परिस्थितीत एवढी मौल्यवान माती नदीमध्ये सोडून देऊ नये. त्यामुळे मोरबे धरणाच्या तलावातील पाणी साठ्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे, असे खेडकर यांनी सांगितले.






