मुंबईकरांच्या आरोग्याचा कोंडमारा! नवीन वर्षाच्या सुरुवातीला पडलेल्या पाऊसामुळे अनेकांना श्वसनविकारांचा त्रास
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे मुंबईत झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी त्याचवेळी ढगाळ हवामान, वाढते प्रदूषण आणि कायम असलेली थंडी यांचा एकत्रित परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः श्वसनविकार, संसर्गजन्य आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित तक्रारी वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.(फोटो सौजन्य – istock)
ढगाळ वातावरणामुळे प्रदूषण खाली बसून राहत असून, पावसामुळे खाली आलेले पीएम२.५ आणि पीएम१० कण हवेतच अडकून राहतात. त्यामुळे दमा, ब्राँकायटिस, सायनस यांसारख्या श्वसनविकारांचा त्रास वाढतो. आधीच प्रदूषित हवेमुळे त्रस्त असलेल्या मुंबईत हा धोका अधिक गंभीर ठरत आहे. यासोबतच दमट वातावरणात जीवाणू आणि विषाणूंची वाढ वेगाने होत असल्याने खोकला, घसादुखी, सर्दी-ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू शकते. पावसामुळे साचलेले पाणी हे डासांचे पैदास केंद्र ठरू शकते. परिणामी, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा धोका नाकारता येत नाही.
मानसिक आरोग्यावरही या हवामान बदलाचा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सततचे ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे शरीरातील ‘सेरोटोनिन ‘ची पातळी घटते, यामुळे नैराश्य, चिडचिड, आळस जाणवण्याचे प्रकार वाढू शकतात, तसेच थंडी आणि आर्द्रतेमुळे सांधेदुखी, संधिवात असलेल्या रुग्णांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेचाही धोका संभवतो.
सध्या मुंबईत पाऊस, थंडी आणि प्रदूषण हे तिन्ही घटक एकत्र आल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी उकळलेले कोमट पाणी प्यावे, बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. घराभोवती पाणी साचू देऊ नये आणि गरम, ताजा आहार घ्यावा.
छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, कायमचा मिळेल आराम
त्वचारोगांच्याही तक्रारी वाढू शकतात. ओलावा आणि घाम यामुळे पावसाळी वातावरणात बुरशीजन्य त्वचारोग जसे की रिंगवर्म, अॅचलीट फूट यांचे प्रमाण वाढताना दिसते. नववर्षाच्या सुरुवातीलाच बदलत्या हवामानामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबईकरांनी काळजी न घेतल्यास हा तिहेरी मारा अधिक गंभीर ठरू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.






