
टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ड्रिलिंगमुळे पर्यावरण धोक्यात? कर्जतमध्ये ग्रामस्थांचा संताप
कर्जत : कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायत हद्दीत प्रस्तावित असलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी माती आणि दगड परीक्षण सुरू आहे.मागील दहा महिने या कामासाठी ड्रिलिंग करण्याची कामे सुरू असल्याने या भागात पहिल्यांदा भूस्खनन होण्याच्या घटना घडल्या. साई डोंगर परिसरात प्रथम अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि झाडे कोसळून मोठे नुकसान झाले.
कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता
पालीतर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायत मध्ये टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे.या प्रकल्पासाठी गेल्या वर्षापासून माती आणि दगड परीक्षण केले जात आहे. त्यासाठी प्रस्तावित धरणाच्या परिसरात विविध ठिकाणी जमिनीमध्ये आणि खडकामध्ये ड्रॉलिंग केले जात आहे. त्या त्या ठिकाणी जमिनीच्या भूगर्भातून माती काढून तर काही ठिकाणी खडकातून काढलेल्या दगडाचे परीक्षण काम सुरू आहे.त्याचा मोठा परिणाम यावर्षी पहिल्याच पावसात दिसून आला. साई डोंगर भागात यापूर्वी कधीही भूस्खनन होण्याच्या घटना घडल्या नव्हत्या.या भागात डोंगरातील माती खाली पडण्याची घटना घडलेली नसल्याने माती परीक्षण करण्यासाठी केले जाणारे ड्रिलिंगमुळे धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती मागील काही महिने सतत व्यक्त केली जात होती.
पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते पप्पू देशमुख यांच्याकडून प्रकल्प जाहीर झाल्यापासून गावागावात जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास कसा होणार हे सांगत होते.मात्र त्यावेळी त्यांचे कोणी ऐकले नाही आणि मालकी जमिनीमध्ये ड्रिलिंग करण्याचे काम सुरू झाले.जमिनी विकत घेतलेल्या नसताना आणि जमिनी भाडेतत्वावर देखील घेतलेल्या नसताना सुरू असलेले ड्रिलिंग यामुळे ग्रामस्थ संतप्त आहे.परंतु प्रशासन गुजरात राज्यातील कंपनीच्या मागे ठामपणे उभे असल्याने दिसून येत आहे.
शेवटी टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी कडून होत असलेल्या अतिरेकामुळे होणारा फटका स्थानिकांना पहिल्याच पावसात दिसून आला आहे.अनेक वर्षाची जुनी झाडे माती ठिसूळ झाल्याने उन्मळून पडत आहेत.माती आणि दगड परिक्षणासाठी गेली आठ महिने दिवसरात्र ड्रिलिंग करण्याची कामे टोरंट कंपनीकडून करण्यात आली.त्याचा परिणाम साई डोंगर परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून झाडे उन्मळून पडत आहेत. अशा घटना साई डोंगर भागात पहिल्यांदा घडत असल्याची माहिती पाली ग्रामस्थ पप्पू मसणे यांच्याकडून देण्यात आली आहे.स्थानिकांनी आतातरी जागे व्हावे आणि बेकायदा सुरू असलेल्या ड्रिलिंग कामाला विरोध करावा अशी मागणी पप्पू मसणे यांनी केली आहे.