रायगड/ संतोष पेरणे : नेरळ माथेरान नेरळ अशी नॅरोगेज मार्गावर चालवली जाणारी मिनीट्रेनची पावसाळी सुट्टी वाढली आहे.ब्रिटिश काळापासून १५ जून रोजी पावसाळी सुट्टीवर गेलेली नेरळ माथेरान नेरळ अशी चालवली जाणारी मिनी ट्रेन दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी सुरू होते. मात्र नॅरोगेज मार्गावर अभियांत्रिकी कामे सुरू असल्याने यावर्षी देखील पावसाळी सुट्टीनंतर देखील ही मिनीट्रेन सुरु झालेली नाही.
ब्रिटिश काळात १९०९ मध्ये सर आदमजी पीरभोय यांनी नेरळ माथेरान या २१ किलोमीटर लांबीचा मिनी ट्रेन मार्गाचा शोध लावला.पुढे मध्य रेल्वेचे ताब्यात हा रेल्वे मार्ग देण्यात आला आणि त्यानंतर मध्य रेल्वेचे माध्यमातून नेरळ माथेरान नेरळ नॅरोगेज मार्गावर मिनी ट्रेन सुरू झाली.ही मिनी ट्रेन ब्रिटिश काळापासून पावसाळ्यात दरडी आणि माती कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन बंद ठेवली जाते.ब्रिटिश काळापासून हा शिरस्ता कायम असून नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन १५ जून पासून १५ ऑक्टोबर पर्यंत पावसाळी सुट्टी आणि नॅरोगेज मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यासाठी बंद ठेवली जाते.मात्र चार महिन्यांनी सुरू होणारी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन १६ ऑक्टोबर रोजी पुन्हा नॅरोगेज मार्गावर येत असल्याने पर्यटक आणि प्रवासी यांच्यासोबत माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण असते.
यंदा माथेरानची ही राणी पर्यटकांच्या सेवेत उशीराने दाखल होणार आहे. या मिनीट्रेनच्या प्रवासासाठी खास दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक माथेरानला भेट देतात. मात्र यावर्षी पर्यकांना हिरमोड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नॅरोगेज मार्गावर चालवली जाणाऱ्या मिनीट्रेनला पावसामुळे समस्या निर्माण झाल्या. याचकारणाने माथेरान मिनीट्रेन आता दिवाळीनंतर सुरु होणार आहे.
माथेरान राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन आणि माथेरान मधील पर्यटन व्यवसाय हे समीकरण झाल्याने माथेरानमधील पर्यटन व्यवसायाला नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन सुरू झाल्यानंतर सुगीचे दिवस येतात.मात्र मागील काही वर्षात मिनी ट्रेनचा पावसाळी हंगाम लांबत चालला आहे.तर १५ जून ही बंद होण्याची तारीख देखील दरवर्षी बदलली जात आहे.यावर्षी तर २५ मे पासूनच नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनचा पर्यटन हंगाम बंद करावा लागला होता.गतवर्षी २२ ऑक्टोबर रोजी म्हणजे नेहमीच्या शिरस्ता नुसार आठ दिवस उशिरा मिनी ट्रेन नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालण्यास सुरुवात झाली होती.यावर्षी पाऊस लांबला असल्याने नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन प्रवास आज नेहमीच्या तारखेला सुरू झालेला नाही.त्यात काही दिवसांनी दिवाळी सण सुरू होत असून यावर्षी देखील दिवाळी मध्ये मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ सेवा सुरू झालेली नसेल.त्यामुळे पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.उन्हाळी पर्यटन हंगाम यावर्षी मे महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने वाहून नेला होता.परंतु पावसाळ्यात तीन महिने प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी माथेरान मध्ये पहायला मिळाली.