Amit Shah (Photo Credit- X)
Amit Shah on Fugitives: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फरार गुन्हेगारांना भारतात परत आणणे आणि त्यांच्यावरील कारवाई अधिक कठोर करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी CBI ने आयोजित केलेल्या ‘भगोड्यांचे प्रत्यार्पण – आव्हाने आणि रणनीती’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक राज्यात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विशेष तुरुंग तयार केले जावेत आणि इंटरपोलच्या रेड नोटीसचा सामना करणाऱ्या भगोड्यांचे पासपोर्ट तत्काळ रद्द केले जावेत. यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय हालचाल थांबेल आणि विदेशी न्यायालयांमध्ये प्रत्यार्पणाविरुद्ध ‘तुरुंगांची वाईट स्थिती’ यांसारखी खोटी कारणे देण्याची संधी त्यांना मिळणार नाही.
अमित शहा म्हणाले, “जोपर्यंत आपण परदेशातून भारतीय अर्थव्यवस्था, आपली सार्वभौमत्वआणि सुरक्षिततेला हानी पोहोचवणाऱ्या फरार गुन्हेगारांच्या मनात भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल भय निर्माण करत नाही, तोपर्यंत आपण देशाची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही.” आर्थिक गुन्हे, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांसारख्या प्रकरणांमध्ये भारताच्या ३३८ प्रत्यार्पणाच्या विनंत्या विविध देशांमध्ये प्रलंबित आहेत. विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या फरार गुन्हेगारांनी विदेशी न्यायालयांमध्ये भारतीय तुरुंगांच्या स्थितीचा बाहना देऊन प्रत्यार्पणाला विरोध केला आहे.
हर राज्य में CBI की स्पेशल यूनिट खड़ी की जाएगी, जो राज्य के भगोड़ों को वापस लाने में मदद करेगी। pic.twitter.com/JjhQpAG22O — Amit Shah (@AmitShah) October 16, 2025
नवीन फौजदारी कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अनुपस्थितीत खटला’ या तरतुदीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन शहा यांनी केले. यामुळे फरार गुन्हेगारांवर भारतात खटला चालवता येईल. प्रत्येक राज्य पोलिसांनी इंटरपोलच्या ‘ब्लू नोटिस’ ‘रेड नोटिस’ मध्ये बदलण्याची प्रक्रिया जलद करावी. शहा यांनी जोर देऊन सांगितले की, फरार गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई केल्यासच भारतीय न्यायव्यवस्थेची विश्वसनीयता वाढेल आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित होईल.