विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. या तालुक्यात चार शासकीय आश्रम शाळा आहेत.चाफेवाडी, पिंगळस,भालिवडी,पाथरज या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याच्या दर्जाबाबत आणि पुरवठ्याच्या वेळेबाबत कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिंता वाटत आहे.कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आश्रम शाळांना रात्रीची अचानक भेटी दिल्या आहेत.
आदिवासी आश्रमशाळेत राहून निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ही धाड पालक आणि आदिवासी संघटनेचे कार्यकर्त्यांनी टाकली.आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या सचिव नितीन निरगुडा आणि कार्यकर्त्यांनी पालकांसह रात्रीच्या वेळी काही आदिवासी आश्रमशाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याची पाहणी केली असता या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वापरण्यात येणारा भाजीपाला दररोज ताजा असणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि ताजा आहार देणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनी भाजीपाल्याचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.आठवड्यात दर गुरुवारी शाळांमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील पुरवठा सोमवारी करण्यात आल्याने जवळपास चार दिवस नवीन भाजीपाला उपलब्ध झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत.
याबाबत शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडून योग्य प्रकारे देखरेख केली जात नाही असे दिसून आले आहे.पालक आणि कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेने उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत संबंधित अधिकारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण होणार का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केलेल्या भाजीपाल्याचा दर्जा समाधानकारक नसल्याचे दिसून आहे असा दावा केला आहे.
तसेच भाजीपाला वाहतूक करणारी गाडी पहाटेच्या सुमारास शाळांमध्ये पोहोचणे अपेक्षित असताना ती रात्री साडेआठच्या सुमारास शाळांमध्ये पोहोचत असल्याचेही समोर आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि ताजा आहार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कर्जत तालुक आदिवासी ठाकूर समाज संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आश्रम शाळांमधील आहार व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रात्रीचे जेवण दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता दिला जातो. मात्र भाजीपाला रात्री उशिरा पोहोचत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या आहार व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






