
पाटस : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधाब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे महान आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा आज (७ संप्टेंबर) जन्मदिन ! त्यांच्या २३१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवन कार्याचा हा थोडक्यात आढावा….!
भारताच्या इतिहासात अनेक गोष्टी अनैतिहासीक आहेत म्हणूनच उच्च वर्णीय इतिहासकारांनी सन १८५७ च्या उठावाला अधिक महत्व दिले. परंतु भारताचा इतिहासात खोलवर डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की, १८५७ च्या उठावाच्या आधीही काही उठाव झाले आहेत. त्यातील एक उठाव म्हणजे १८२१ चा उठाव. मात्र तथागथीत इतिहासकारांनी जाणून बुजून ह्या उठावा बाबत लिहिणे टाळले कदाचित ते लिहिले गेले असते तर उपेक्षित बहुजन समाजातील उमाजी नाईक हा क्रांतिवीर बहुजन समाजाला समजला गेला असता. मात्र इतिहास कोणाच्या लेखणीने पुसला जात नाही, सुर्याच्या प्रकाशा इतके ते चमकत असते.
उमाजी नाईक यांच्या जीवन संघर्षच्या खाणाखुणा ही माती आजही त्याची साक्ष देत आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महाराष्ट्रात पेशव्यांच्या हाती सत्ता आली. पेशव्यांचा पराभव ब्रिटिशांनी १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे केला व त्यानंतर संपूर्ण भारतात इंग्रजांची राजवट आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा पुढे चालवला तो आदिवासी, भटक्या विमुक्त बहुजन समाजातील थोर क्रांतिकार क्रांतीवीरांनी, भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यात सर्वप्रथम इंग्रज विरुद्ध बंड पुकारला असेल ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा थोर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे आणि बिहार मधील आदिवासी नायक बिरसा मुंडा यांनी त्यापैकी महत्त्वाची कामगिरी बजावली ती महाराष्ट्रातील रामोशी समाजातील नरवीर उमाजी नाईक यांनी.
पारतंत्र्याची होळी करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारून गोऱ्या माकडांना चालते व्हा, अशी सर्वप्रथम डरकाळी फोडणाऱ्या या महान क्रांतिकारी उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याचा व धाडसी पराक्रमांचा सध्याच्या इतिहासकारांना व सरकारला विसर पडला आहे. राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवंडी या गावी ७ सप्टेंबर १७९१ साली रामोशी समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादूजी खोमणे (नाईक )होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम करीत होते. वडिलांच्या मृत्युनंतर उमाजी हे सतू नाईक यांच्याबरोबर काम करीत होते. उमाजी हा लहानपणापासून चंचल हुशार व धाडसी तर प्रत्येक कामात चंचल होता. त्यावेळी भारतभर इंग्रजांनी सत्ता स्थापन करण्यासाठी लढा सुरू केला होता.
देशाचा प्रत्येक भाग त्यांनी काबीज केला होता. इंग्रजांची राजवट दिवसेंदिवस वाढत चालली होती. इंग्रजांच्या राजवटीमुळे सर्व संस्थाने व राजेशाही भयभीत झाली होती. त्याचवेळी इंग्रज सरकारच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार उमाजीने केला होता. इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देत, मोठे सावकार, व्यापारी अशा लोकांना लुटायला सुरुवात केली. यावेळी उमाजी पकडला गेला. सक्त मुजरीची शिक्षाही झाली परंतु उमाजी नाईक यांनी तुरुंगात असताना लिहायला व वाचायला शिकले, तुरुंगातून सुटल्यावर गप्प न बसता उमाजींनी रामोशी, महार, मांग, भिल्ल आदिवासी आदी सवंगडी घेऊन टोळी बनवली. प्रथम पुण्यातील भांबुर्डे येथील इंग्रजांचा खजिना लुटला. ह्या लुटीत त्यांना सहा हजाराची रक्कम मिळाली. उमजींच्या धाडसाने इंग्रज सरकारची झोप उडाली, उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी शंभर रुपयांचे बक्षीस जाहीर केले व ते पुढे दहा हजार रुपये पर्यंत वाढत गेले तरी उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही.
उमाजींनी इंग्रज सत्तेविरुद्ध बंडाला सुरुवात केली होती तो काळ होता १८२१ ते १८२७ चा. उमाजी नाईकांनी ३० डिसेंबर १८२७ रोजी इंग्रजांना चालते व्हा असा निर्वाणीचा इशारा दिला. उमाजीची ताकद दिवसेंदिवस वाढू लागली होती, समाजातील गोरगरीब जनतेचा उमाजींना पाठींबा मिळत होता. पुणे, सातारा,सांगली, या भागात उमाजी नाईक यांनी इंग्रजांना जिकरीस आणले. इंग्रजांची सत्ता उखडून टाकणे हे त्यांचे अंतिम ध्येय होते तर उमाजी राजांना पकडण्यासाठी इंग्रजांनी मोहिम आखली होती. पुरंदर किल्ल्याच्या पश्चिमेस उमाजी व इंग्रज शिपायांची तुंबळ लढाई झाली यात इंग्रज शिपायांच्या मुडक्यांची माळ सरकारला भेट म्हणून देत इंग्रजांना उमाजींने आव्हान दिले होते. उमाजी नाईक यांनी ठिकठिकाणी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती तर गनिमी कावा करून इंग्रजांना जिकरीस आणले होते.
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रज सरकारच्या विरोधात उमाजी नाईक यांनी जाहीरनामा काढून सर्वांना या बंडात सामील होण्याचे खुले आव्हान केले व उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टॉश यांची नेमणूक केली होती. आणि अखेर इंग्रजांनी उमाजींनी भोर तालुक्यातील उगोली येथे कपटनितीने पकडण्यात यश आले. उमाजी राजेंना पुण्यात खडकमाळ येथील तुरुंगात ठेवण्यात आले. त्यावेळी कॅप्टन मॅकिन्टॉश हा उमाजींची दररोज तुरुंगात भेट घेऊन सर्व माहिती आपल्या डायरीत लिहुवुन ठेवत. कॅप्टन मॅकिन्टॉश ने उमाजी राजांचे जीवन चरित्र आपल्या डायरीत लिहून ठेवले आहे तो आपल्या लेखनात म्हणतो काळ अनुकूल असता तर उमाजी हा दुसरा शिवाजी झाला असता. उमाजी राजेंना इंग्रजांनी ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुणे मामलेदार कचेरीच्या आवारात फाशी दिली. रयतेला दहशत बसावी म्हणून त्यांचा मृत्युदेह त्याच आवारातील फाशी दिलेल्या पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकुन ठेवण्यात आला. उमाजी नाईकांना ज्या तुरुंगात ठेवले ती बंदिस्त अंधार कोठडी, फाशी दिली ते पिंपळाचे झाड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही या ठिकाणी पहावयास मिळतात.
उमाजी राजेंना अवघ्ये ४१ वर्षांचे आयुष्य लाभले तर ११ वर्षांचा कालावधी हा त्यांचा जीवन संघर्षचा महत्वपूर्ण काळ ठरला. हा अकरा वर्षाचा कालावधी उमाजी नाईक हे इंग्रज सरकारचा गर्दनकाळ ठरले.,अकरा वर्षांच्या गनिमी काव्याची लढाई ने इंग्रज अधिकारी सळो की पळो करून सोडले होते. कमी कालावधीत स्वतंत्र्याठी केलेला हा संघर्ष हा काय साधी सोपी गोष्ट नव्हती.त्यांच्या या उठावाने १८५७ च्या उठावाला मोठी प्रेरणा मिळाली आणि ती १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वंतत्र घेऊनच थांबली. परंतु यंदा देशाचा स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव साजरा करत असताना भारत सरकारने व तथाकथीत इतिहासकारांनी या महान क्रांतिकारच्या बलिदानाची साधी दखल ही घेतली नाही ही मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र सरकारनेही राजे उमाजी नाईक यांच्या बलिदान दिन, स्मृती ठिकाण व जन्मगाव या ठिकाणची दखल घेतली गेली नाही. आजही ऐतिहासिक वारसा जतन केला जात नाही, या प्रश्नांकडे सरकारला वेळ नाही, आजही ते उपेक्षित व दुर्लक्षित आहेत.
[read_also content=”२०२४ ला बारामतीचा गड जिंकू : चंद्रशेखर बावनकुळे https://www.navarashtra.com/maharashtra/we-will-conquer-the-fort-of-baramati-in-2024-chandrasekhar-bawankule-nrdm-323000.html”]
रामोशी समाजासह बहुजन समाजाच्या विविध संघटना गेली अनेक वर्षांपासून राजे उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आलेल्या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, त्याठिकाणी उमाजी राजे नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा तसेच त्यांचे तैलचित्र सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा – कॉलेज यामध्ये लावण्याची सक्ती करावी व राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा अभ्यास क्रम शालेय पाठ्यपुस्तकात घ्यावा, त्यांना ह्या देशाचा पहिला शहीद भूमिपुत्र आद्य क्रांतिवीर म्हणून घोषित करावे. उमाजी नाईक हे भारत रत्न या पुरस्काराचे हक्कादार आहेत. राज्य सरकारने राजे उमाजी नाईक यांच्या भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करावा, त्यांची स्मृती स्थळे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करुन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा हीच त्यांच्या जयंती दिनी अपेक्षा…!