'डीसीसी बँक बुडवणाऱ्यांनीच निवडणूक लादली'; विजयीनंतर राजेंद्र राऊतांचा मोहिते-पाटील गटावर हल्लाबोल
ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) बुडवली, दूध संघ अडचणीत आणला, त्यांनीच स्वतःच्या अहंकारातून ही निवडणूक लादली. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बळी देत त्यांनी प्रतिष्ठेची लढाई उभी केली,अशा शब्दांत नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य राजेंद्र राऊत यांनी मोहिते-पाटील गटावर जोरदार टीका केली.
Satara News: कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी
राऊत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी समन्वय ठेवत होतो. मात्र मोहिते-पाटील यांनी मुद्दाम निवडणूक डीसीसी बँकेच्या मुद्द्यावर नेली. आज त्यांच्याकडे सुमारे ६०० कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर बार्शीचे सोपल यांच्याकडेही ३०० कोटीची थकबाकी आहे. परंतु तत्कालीन संचालक मंडळातील अनेक सदस्य आज माझ्या सोबत आहेत. अनगरचे राजन पाटील, बबनराव शिंदे, संजय शिंदे यांच्याकडे असणारी कर्ज त्यांनी परतफेड केली आहे. प्रशांतराव परिचारक यांच्याकडे तर कर्जाचा विषयच नाही आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू यांच्याकडेही कर्ज नाही.तरीही निवडणुकीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.
निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या शब्दाची आठवण करून देताना राऊत म्हणाले, मोहिते-पाटलांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उत्तर देणार, असे मी जाहीर केले होते. अधिवेशन संपल्यानंतर अकलूजमध्ये भव्य सभा घेऊन सर्व मुद्द्यांवर खुलासा करणार आहे. या विधानातून त्यांनी पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाला थेट आव्हान दिले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेला ‘दूध पंढरी’ सहकारी दूध संघ पुन्हा सुरू करण्याचा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या नेत्यांनी उभारलेल्या या संस्थेला मोहिते-पाटील यांच्या काळात उतरती कळा लागली. आता हा संघ पुन्हा उभा करून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांनी ४८३ मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली. राऊत यांनी तब्बल ३६५ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. ६१६ मतदारांपैकी ६१४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा होती. मोहिते-पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रचार मोहीम राबवत भाजपला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यास भाग पाडले. मात्र निकालाने भाजपची संघटनात्मक ताकद आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जिल्ह्यातील वाढते वर्चस्व अधोरेखित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेवरील एकहाती सत्ता मिळवल्यानंतर विधान परिषदेतही भाजपचा झेंडा फडकवण्यात जयकुमार गोरे यांना यश आले. या निकालामुळे मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का बसला असून जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व आणखी मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.






