भाजपला दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष खासदार आणि काँग्रेस समर्थक विशाल पाटील यांना थेट ऑफर दिलीय. आता, या ऑफरवरून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. भाजपला अजून सुद्धा दुसऱ्याचीच पोर चांगली का वाटतायत? असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. दरम्यान, विशाल पाटील यांनी भाजपची ऑफर स्वीकारली नसल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपप्रणित एनडीएचं सरकार बहुमताने स्थापन झालं. मात्र, एकहाती सत्ता घेण्याचा, स्पष्ट बहुमत मिळविण्याचा भाजपचा संकल्प मार्गी लागला नाही. त्यामुळे, एनडीएमधील घटक पक्षांच्या आधारावरच भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने घवघवीत यश मिळवलं असून महायुतीने 237 जागा जिंकत सरकार स्थापन केलं. मात्र, अद्यापही भाजपकडून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना ऑफर दिल्या जात आहेत.
जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळेल, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना थेट भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती. सांगलीतील एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते. आता, भाजपच्या या ऑफरवर माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”रेडीमेड कार्यकर्ते घेण्यापेक्षा गेली अनेक वर्ष तळागाळामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलेले आहे, त्यांना आता संधी द्या. मात्र, अजून सुद्धा भाजपला दुसऱ्याचीच पोर चांगली का वाटतायत, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना दिलेल्या भाजप प्रवेशाच्या ऑफरवर राजू शेट्टीनी शेलक्या शब्दात टीका केली. विशाल पाटलांनी अशा पद्धतीच्या कोणत्याही ऑफरला बळी न पडता वसंतदादांचा खराखुरा वारसा दाखवून द्यावा, एवढी त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे, असेही शेट्टी यांनी म्हटले.
भाजपने आयात उमेदवार घेण्यापेक्षा जे त्याचे कार्यकर्ते आहेत त्यांना पुढे करावे. जरा स्वतःच्या पोरांना शिकवा, शहाणे करा आणि त्यांना जगासमोर आणा, असा माझा चंद्रकांत पाटील सल्ला असेल असे म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपाकडून विशाल पाटील यांना दिलेल्या प्रवेशाच्या ऑफरवरती टोला लगावला आहे. आता, राजू शेट्टींच्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.