श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा; राजेंद्र शेळके यांची माहिती
पंढरपूर : चैत्र शुध्द नवमीला प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी दहा ते बारा या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलास उपवासाचा महानैवेद्य दाखवून दुपारी बारा वाजता पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून राम जन्मोत्सव सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
यावेळी राम जन्माची कथा होऊन प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. तसेच श्री विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे विठ्ठल सभामंडप येथे रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे व कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. सुमारे 2000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
नवमी तिथीला अनन्यसाधारण महत्त्व
सनातन धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचागानुसार, रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी सूर्यवंशी राजा दशरथच्या घरी भगवान रामाचा जन्म झाला, म्हणूनच रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा केली जाते. या दिवशी लोक भगवान श्रीरामाची पूजा करतात आणि रामचरितमानसाचे पठण करतात. हे व्रत पाळणाऱ्या लोकांनी पूजेदरम्यान रामनवमीची व्रतकथा अवश्य पाठ करावी. या दिवशी व्रत कथा वाचणे व श्रवण करणे अत्यंत शुभ आहे.