माळशिरसमध्ये एमआयडीसी उभी राहणार (फोटो - टीम नवराष्ट्र)
माळशिरस : गेल्या अनेक वर्षापासून माळशिरस तालुक्यातील एमआयडीसीचे स्वप्न अपूर्ण असून तालुक्यातील तरुणांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना रोजगारासाठी शहराच्या ठिकाणी जाऊ लागू नये यासाठी माळशिरस तालुक्यात लवकरच अद्यावत एमआयडीसी उभी राहणार असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होणार आहे तर निरा उजव्या कालव्यापासून वंचित असलेल्या तालुक्यातील 22 गावांना निरा देवघरचे पाणी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी पत्रकारांना दिली .
तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते पण या प्रयत्नांना आज अखेर मुर्त स्वरूप मिळत असून माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी दोन ते तीन ठिकाणच्या जागेची पाहणी झाली असून या जागेवर जर एमआयडीसी होत असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होणार असून तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे याचबरोबर परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालालाही चांगला बाजारभाव मिळणार आहे तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे याचबरोबर गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या निरादेवघरच्या पाण्याचा प्रश्नही सुटला असून येत्या दोन वर्षात हे पाणी तालुक्यातील 22 गावांना मिळणार आहे अशी माहिती दिली
माजी आमदार राम सातपुते हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते आमदार असताना त्यांनी हे प्रश्न सभागृहात तत्कालीन मंत्री महोदयांकडे लावून धरले होते. पत्रव्यवहार केला होता. त्यास सध्या मूर्त स्वरूप मिळाले असून लवकरच माळशिरस तालुक्यात अद्यावत एमआयडीसी व नीरा देवघर चे 22 गावांना पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांसह तरुणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे आमदार असताना राम सातपुते यांनी केलेल्या कामाची ही पोहचपावती असल्याचे बोलले जात आहे.
भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा- देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. या नवीन प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या चार तालुक्यातील नागरिकांना आणि शेतीला याचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा: नीरा-देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३ हजार ५९१ कोटींचा निधी; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून याबाबतच्या मंजूरीचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या झालेल्या बैठकीत गुंतवणूक मंजुरी समितीच्या शिफारशीनुसार या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. सिंचन, पूरनियंत्रण आणि बहुउद्देशीय प्रकल्पांवरील सल्लागार समितीच्या अटींच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात आली असल्याचेही जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केले आहे.