मुंबई-गोवा हायवे ट्रॅफिक (फोटो- सोशल मिडिया)
मुंबईच्या दिशेने निघालेले आपले आप्तस्वकीय सुखरूप पोहोचतात की नाही, याची चिंता घरच्यांना सतावत असून फोनवरून सातत्याने चौकशी सुरू आहे. इंदापूर परिसरात वाहतूक पोलीस आणि शासकीय यंत्रणा ही कोंडी सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असली, तरी हा महामार्ग कधी मोकळा होणार, याचीच प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे एकाच मार्गावरून दोन्ही बाजूंची दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.
मुंबईकडे जाणारी वाहने एकाच वेळी तीन ते चार रांगांमध्ये घुसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. काही ठिकाणी तर वाहने तासन् तास जागची हलतच नव्हती. सर्वात गंभीर बाब म्हणजे या भीषण कोंडीत काही आपत्कालीन रुग्णवाहिकाही अडकून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक कमालीचे हवालदिल झाले होते. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी इंदापूर ते कोसिंबळे दरम्यानच्या मार्गावर वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांसोबतच माणगाव व महाडच्या दिशेने जाणाऱ्या स्थानिक वाहनचालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सणासुदीच्या काळात रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने आणि त्या तुलनेत नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवली. वाहने एकमेकांच्या अगदी जवळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तासनतास प्रवाशांना एकाच जागी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे चाकरमान्यांच्या आनंदी प्रवासाचा हिरमोड झाला असून महामार्गावरील दुरवस्थेबाबत संताप व्यक्त होत आहे. वाहतुकीची कोंडी वाढत असतानाच काही घाईगर्दी करणाऱ्या बेशिस्त वाहनचालक नियम धाब्यावर बसवून ओव्हरटेकिंग सुरू केले. ओव्हरटेकिंगच्या या प्रयत्न रस्त्यावरील गोंधळात आणि कोंडीत आणखीच भर पडली.
‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला






