फोटो सौजन्य- प्रतिनिधी
चिपळूण (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जपणूक करत देश- महाराष्ट्र उभा करण्याचे मोठे काम शरद पवार यांनी केले आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश ते निवडणूक प्रचार, मतमोजणी व पराभवानंतर शरद पवार यांचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी शरद पवारांच्या वाढदिवशी हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्यात प्रतिपादन करतांना शरद पवारांची कधीही साथ सोडणार नाही, असा निर्धार यादव यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार,आदी उपस्थित होते.
यावेळी यादव पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या बरोबरीने शरद पवारांनी देश- महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. शरद पवार असतील किंवा अगोदरच्या नेत्यांनी सभागृह चालवत असताना एकमेकांसह विरोधकांचा सन्मान राखला. मात्र, आता एकेरीवर आल्याचे पहावयास मिळते, याची खंत आहे, असे मत यादव यांनी यावेळी मांडले.
शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाही!
निवडणुकीच्या पराभवानंतर आपण भाजपमध्ये जाणार अशा अफवा, चर्चा सुरू होत्या. मात्र, शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ९० हजार लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं. या प्रेमातून उतराई होण्यासाठी दुसऱ्या कुठे जायचे गरज नाही. या मंडळींच्या हृदयात जे स्थान आहे. हीच मोठी आपल्या कामाची पोच पावती आहे. विचारांची लढाई लढलो. प्रचंड मोठी दरी होती. काय होणार ? या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. किती ताकद समोरच्याकडे याची मला कल्पना होती. तरीसुद्धा मला माहित होतं की मी लढणार आहे ती माझ्या विचारांची लढाईसाठी आणि आज तीच लढाई मला पुढे घेऊन जायचे राजकीय स्थित्यंतर बदलतील राहतील काही माहित नाही. त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये आपलं भविष्य काही आहे ते माहीत नाही. पण एक मात्र निश्चित आहे, की ज्या लोकांनी साथ केली. त्या लोकांचा विश्वास जपण्याचं काम ह्या पुढच्या काळात करत राहणार!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्याच्या दिल्या सुचना!
यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या आठवणींना उजाळा देतांना शरद पवारांनी वाशिष्ठी डेअरी असो, चिपळूण नागरी पतसंस्था असो, या दोन्ही संस्थांची आपुलकीने माहिती जाणून घेतली. तत्पूर्वी पवारांकडे या दोन्ही संस्थांविषयी इंत्यभूत माहिती होती, हे पहावयास मिळाले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशादरम्यान चिपळूणमध्ये पुन्हा पक्ष उभा करण्याच्या दृष्टीने कामाला लागा, अशा सूचना केल्या नंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतर्फे आपल्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यानंतर शरद पवारांना भेटायला गेलो. तेव्हा आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. रमेश कदम आणि तुम्ही दोघांनी मला ही लढाई जिंकून द्यायची आहे, त्यासाठी माझी ताकद तुमच्या पाठीशी आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर निवडणूक प्रचारादरम्यान दोन वेळा फोन करून काही अडचण आहे का ? अशी विचारणा केली. यावरून देशातील एकमेव नेता असेल की जे उमेदवारला स्वतः फोन करून तुम्हाला काय अडचण आहे का ? याची विचारणा करतात. यावरून शरद पवारांची काम करण्याची पद्धत पाहून आपण भारावून गेलो, अशी आठवण यादव यांनी यावेळी काढली.
आता कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही!
शरद पवार साहेबांचे आपण नेतृत्व मानले असून कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही. देश- राज्याच्या जनतेसाठी जे काही असेल ते करीत राहायचं. निश्चितपणे आपल्याला न्याय मिळतो, याची आपल्याला खात्री आहे. आपण सर्वजण शरद पवारांचे नेतृत्व मानले तर त्याच पद्धतीने खंबीरपणे पुढे चालत राहण्याची आपल्या सगळ्यांमध्ये धमक असायला पाहिजे आणि ते आपण सगळ्यांनी या पुढच्या काळात त्या पद्धतीने उभे करण्याचे काम करूया. शरद पवारांचे नेतृत्व पाठीशी असणारी आपण सगळी मंडळी आहोत. या इतिहासाचे उद्याचे साक्षीदार आहोत. आपण या महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळं वलय देऊ शकतो, अशी खात्री आहे, असा विश्वास यादव यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. दीपिका कोतवडेकर, सुमती जांभेकर, वासुदेव मेस्त्री, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ज्येष्ठ पत्रकार सुहास बारटक्के आदींनी मनोगते मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी केले.






