अहमदनगर : राज्यामध्ये मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणासाठी बांधव आग्रही आहेत. अनेक ठिकाणी धनगर आरक्षणासाठी आंदोलने उभारली जात आहे. आता धनगर बांधवांसाठी आनंदवार्ता समोर येत आहे. धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येणार आहे. पुनर्विचार याचिकेद्वारे न्याय मागणी मांडण्यात येईल. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 299 वी जयंती सोहळ्यात आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याविषयी जाहीर मत मांडले.
ओबीसी आरक्षणावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “ओबीसी हक्काच्या लढाईत आम्ही भुजबळांसोबत आहोत. भुजबळंची राजकीय भूमिका काय आहे हे मला माहित नाही. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि ओबीसी हा लहान भाऊ आहे. मराठा- ओबीसी समाजातील वातावरण दूषित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. ओबीसी हा गरीब समाज आहे. तो कोणाच्या भानगडीत पडणारा नाही. मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे ते तसेच पुढे गेले पाहिजे.” असे मत गोपीचंद पडळकर यांनी केला.
एसटीमध्ये समावेशासाठी आम्ही आग्रही
धनगर समाजाचा संघर्षाचा काळ आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आरक्षणाचे एसटीमध्ये समाविष्ट होणे हे आमचे ध्येय आहे.सरकारी बाबूंनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्यामुळे आमच्यावर वाईट वेळ आली.हायकोर्टाचा निकाल आमच्या विरोधात गेला. सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी पुनर्विचार याचिका केली होती ती पण फेटाळण्यात आली. मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा आजही विश्वास आहे. आता पुनर्विचार याचिका दाखल करत आहे. सरकारने पाठबळ देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.






