वडखळ : एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणाचे (Quadrangle) काम कासवगतीने सुरु असतानाच या कामाकडे दुर्लक्ष तर झालेच आहे. मात्र या महामार्गाला लागूनच असणाऱ्या सर्व्हिस रोडकडे (Service Road ) देखील दुर्लक्ष करण्यात आल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे (Huge pits)पडले आहेत. त्यामुळे, या रस्त्याची पुरती दाणादाण झाली आहे.
दरवर्षी पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. हे प्रशासनाला माहीत असून देखील पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे क्रमप्राप्त असताना या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पेण तालुक्याला लागून जाणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाच्या लगत वाशी नाका ते वडखळ या सर्व्हिस रोडकडे दुर्लक्ष झाल्याने आणि या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना याचा मोठा फटाका बसत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने किती मोठा खड्डा आहे याची कल्पना देखील येत नसल्याने अनेक वेळा दुचाकीस्वार गाडीवरून पडण्याच्या घटना घडत आहेत.
पेव्हर ब्लॉक (Paver block) आले पूर्णपणे बाहेर
या शिवाय याच रस्त्यावरून तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस देखील जात आसल्याने या बस मधून प्रवास करणारा विद्यार्थी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आदी प्रवाशांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर डांबराऐवजी टाकलेले पेव्हर ब्लॉक पूर्णपणे बाहेर आले असून त्यामुळे हा रस्ता अधिकच खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देऊन देखील याकडे ते दुर्लक्ष करत असल्याने या सर्व्हिस रोडबाबत त्यांना काही घेणेदेणे राहिले नसल्याचेच आता वाटू लागले आहे. दरम्यान, या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
मागील अनेक वर्षांपासून उचेडे ते वडखळ या जुन्या मुंबई गोवा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता तर होत नाहीच शिवाय या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जात नाही. आम्ही दुचाकी चालवत असताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखाद्याचा अपघात होऊन त्याचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ?
-प्रसाद पाटील, दुचाकीस्वार, कांदळे
पडलेल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना मोठया प्रमाणात पाऊस होण्याआधीच हे खड्डे भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, लवकरच हे खड्डे भरून रस्ता सुस्थितीत आणून प्रवासी आणि वाहनचालक यांचा प्रवास सुखरूप होईल.
-विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, पेण