(फोटो- रोहित पवार/ट्विटर)
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एसआरपीएफ केंद्राचे झालेले लोकार्पण हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. एसआरपीएफ केंद्राबाहेर मोठा पोलीस फौफाटा तैनात करण्यात आला आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार या ठिकाणी पोहोचले. यावेळेस पोलिसांकडून रोहित पवारांना अडवण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरून वाद निर्माण झाला आहे. या लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण होणार होते. आमदार रोहित पवारांनी या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना पोलिसांनी रोहित पवारांना अडवले. त्यांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रॅम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात… दिवसाढवळ्या खून पडतात… कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले.. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही… मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता.… pic.twitter.com/GkNftoCBbC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 26, 2024
”राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून पडतात. कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता. जामखेड) एसआरपीएफ केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय. तुम्ही कितीही लावा बंदोबस्त. स्वाभिमानी जनताच तुमचा बंदोबस्त करेल,” असे ट्विट रोहित पवारांनी पोस्ट केले आहे.
अहमदनगरमधील जामखेड कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवारांनी केले होते. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी प्रवेशद्वाराबाहेरच रोहित पवारांना अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली. संबंधित प्रशिक्षण केंद्राचे काम १०० टक्के पूर्ण झाले नसल्याचे सांगितले जात आहे .