Photo credit: social media
नाशिक: राज्यभरात दिवसेंदिवस टोळी युद्ध, खून, दरोडे, मारामाऱ्या, धमक्या देणे, दहशत निर्माण करणे यांसारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात आता नाशिकचीही भर पडली आहे. नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या एका कुख्यात गुंडाची जंगी मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावही व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी सुमोटो कारवाई अंतर्गत संबंधित गुंडाच्या मुसक्या आवळून त्याला आणि त्याच्या साथीदारांना तुरुंगात पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील हर्षद पाटणकर नावाच्या कुख्यात गुंडाला नाशिक पोलिसांनी जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी कायद्यांतर्गत हर्षद पाटणकरला अटक केली होती. गेल्या वर्षभरापासून तो नाशिक रोड कारागृहात होता. पण मंगळवारी (23 जुलै) हर्षदची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी जेलमधून सुटलेल्या गुंडाची शहरात जंगी मिरवणूकही काढली. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगार आणि टवाळखोरही सहभागी झाले होते. नाशिक शहरातील शरणपूर रस्त्यावरून आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली.
धक्कादायक म्हणजे ही मिरणूक काढताना गाड्यांचा ताफा, कर्णकर्कश हॉर्न, अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी देण्यात आली. या मिरणुकीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागले. नाशिक पोलिसांच्या हाती व्हिडीओ लागताच सरकारवाडा पोलिसांनी हर्षद पाटणकरसह त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सात-आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पण या प्रकरामुळे या गुंडप्रवृत्तीने पोलीस यंत्रणांनाच आव्हान दिले आहे का,असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हर्षद पाटणकरविरोधात पंचवटी, इंदिरानगरआणि उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात मारामारी, चोरी, घरफोडी, शिवीगाळ आणि धमकी देणे, हत्येचा प्रयत्न करणे, हत्यार बाळगणे यांसह अन्य काही गुन्ह्यांचा सहभाग आहे.