संघाचे संयुक्त महासचिव अतुल लिमये (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024: महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. महायुतीने न भूतो न भविष्यती असे यश संपादन केले आहे. महायुतीने 288 जागांपैकी एकूण 230 जागा जिंकत घवघवीत बहुमत प्राप्त केले आहे. तर एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे भाजपने विधानसभेत सूक्ष्म नियोजनवर भर दिला. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मायक्रो प्लॅनिंग कामी आल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये संघाचे अतुल लिमये यांच्या योग्य नियोजनामुळे भाजपला यश प्राप्त झाल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. जो निकाल समोर आला ते पाहून ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे म्हटले जाते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला नियोजनबद्ध मदत केल्याचे समोर येत आहे. हे सगळे नियोजन संघाच्या अतुल लिमये यांनी केल्याचे म्हटले जात आहे. अतुल लिमये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत.
कोण आहेत अतुल लिमये?
अतुल लिमये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव आहेत. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आखलेल्या कुशल रणनीतीमुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जाते. अतुल लिमये हे गेले अनेक वर्षे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. त्यांनी ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण वेळ संघासाठी प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कुशल आणि सूक्ष्म नियोजन केले, त्यामुळेच भाजपला विजय मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
अतुल लिमये हे सुरुवातीला महाराष्ट्रात, रायगड आणि कोकण प्रांतात काम करत होते. त्यानंतर त्यांना देवगिरी प्रांत, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. ते सह प्रांत प्रचारक होते. 2014 च्या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र , गुजरात आणि गोवा प्रांताची व्यापक जबाबदारी देण्यात आली. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची सखोल जाण असल्याने, तसेच अगदी तळगाळापर्यंत संपर्क असल्याने उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांचे समोर आले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी लिमये यांनी नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस व संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाह जवळून काम केले. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीसांची विजयाची हॅट्ट्र्रिक
देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.