फोटो - टीम नवराष्ट्र
नीरा : ‘माऊली माऊली’चा जयघोष आणि हरिनामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाहीस्नान घालण्यात आले. आळंदीहून पंढरपुरला आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने शनिवारी वाल्हे येथील मुक्काम आटोपून नीरानगरीकडे मार्गक्रमन केले. दुपारी या पालखी सोहळ्याचे नीरा नगरीमध्ये आगमन झाले. त्यानंतर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत शाहीस्नान घालण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीकडे पालखी सोहळा मार्गस्थ
स्वागतानंतर हा सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीकाठी असलेल्या पालखी तळावर विसवला. दुपारचे भोजन आणि विश्रांती झाल्यानंतर दुपारी एक वाजता हा पालखी सोहळा निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. ब्रिटिश कालीन पुलावरून माऊलींचा हा लवाजमा मोठ्या डौलाने नीरा नदी पार करून दत्तघाटाकडे मार्गस्थ झाला. दुपारी दीड वाजता दत्त घाटावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. यावेळी ‘माऊली माऊली’ असा एकच जयघोष आसमंतामध्ये दुमदुमला. स्नान सोहळ्यानंतर हा पालखी सोहळा हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीकडे मार्गस्थ झाला. यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाकडून या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाकडून सातारा जिल्हा प्रशासनाकडे हा पालखी सोहळा सुपूर्द करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा निरा नदी काठी विसवल्यानंतर नीरा आणि परिसरातील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. लोकांना सुखकर दर्शन घेता यावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने दर्शन रांगेची सोय करण्यात आली होती. नीरा, जेऊर, मांडकी, गुळूंचे, कर्नलवाडी, राख, नींबूत, सोमेश्वरनगर त्याचबरोबर पाडेगाव या गावातील ग्रामस्थांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून निघाला असताना पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सासवड जेजुरी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठी काळजी घेतली जात होती. जेजुरी परिसरात आल्यावर पोलीस उपविभागाचे पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता. पालखी सोहळ्यामध्ये वाहतुकीचा कोणताही अडथळा होऊ नये म्हणून काळजी घेतली जात होती. त्याचबरोबर वारीच्या मार्गावर रात्रीच्या वेळी झोपलेल्या वारकऱ्यांना वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून नीरा शहारापासूनच वाहनांना पालखी मार्गावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती.