डोंबिवली : साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरू असताना रूममध्ये असलेले दागिने आणि रोकड पाहून दोन ब्यूटीशियन तरुणींची नियत फिरली. दोघींनी नवरीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. मात्र, तिचे हे कृत्य तिसरा डोळा सीसीटीव्ही बघत होता. अखेर डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोन चोरट्या महिलांना अटक केली आहे. फक्त दागिने पाहून नियत फिरली त्यामुळे हे कृत्य केल्याचे त्या दोघींनी सांगितले आहे. या महिलेने या पूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.
२३ वर्षीय तरुणीचा साखरपुडा कार्यक्रमातील प्रकार
१५ ऑगस्ट रोजी मुलुंड येथे राहणाऱ्या पूजा गुप्ता या २३ वर्षीय तरुणीचा साखरपुडा होता. साखरपुडा कार्यक्रम सुरू असताना सर्व पाहुणे मंडळी डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथील सोनल हॉलमध्ये जमा झाले होते. कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात नवरदेव, पाहूणे व्यस्त असताना हॉलमधील ज्या रुममध्ये नवरीचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी कोणी नव्हते.
नवरीचे दागिने आणि पैसे पाहून फिरली नियत
याच वेळी पूजा गुप्ताचा मेकअप करणारी कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोघी रूममध्ये आल्या. पूजा गुप्ताची पर्स पाहून दोघींची नियत फिरली. कल्पना हिने पर्समधील दागिने काढून घेतले. तर अंकिता हिने पर्समधील रोकड चोरली. कार्यक्रमानंतर त्या दोघी निघून गेल्या. आपले दागिने हरविल्याचे पूजाच्या लक्षात येताच या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, प्रशांत सरनाईक, विशाल वाघ देविदास पोटे, आशा सूर्यवंशी यांच्या पथकाने तपास सुरु केला.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक
हॉलमधील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. सीसीटीव्हीत दिसून आले की, कल्पना आणि अंकिता या दोघी पूजाच्या रुममध्ये ये-जा करीत होत्या. दोघींना ताब्यात घेऊन पोलिस तपास सुरु केला. आधी त्या दोघींनी हे कृत्य केले नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्या दोघींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कबूली दिली. दागिने पाहून नियत फिरल्याने दागिने आणि रोकड चोरी केले असे सांगितले. यापैकी कल्पना ही मालाड येथे राहणारी असून अंकिता ही नालासोपारा येथे राहते.
Web Title: Seeing the brides jewelry and cash in the sugar bowl both of them changed their minds two beautician women committed theft nryb