नवी मुंबई : राज्यात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वासामान्य माणसांची देखील वाणसामानाची लगबग होताना दिसत आहे. रांगोळी,पणती कंदिल यासाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होतानाचं दिसत आहे. अशातच आता नवी मुंबईत पुन्हा एकदा फुटपाथ आणि गर्दीच्या भागांत फटाक्यांच्या स्टॉल्सची भर पडली आहे. दिवळी म्हटली की रोषणाई आलीच मात्र त्याचबरोबर जोडले जातात ते म्हणजे फटाके. नवी मुंबईच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात फाटके विक्री होत असून रस्यांबाबतच्या कायद्यांचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
गर्दीच्या ठिकाणी आणि पादचाऱ्यांच्या मार्गावर उघडपणे फटाक्यांची विक्री होत असल्याने केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाहीये, तर नागरिकांच्या जीवनालाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. फुटपाथवर रहदारी जास्त असल्याने उभारलेल्या या स्टॉल्समुळे चालणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनरजीत चौहान यांनी नवी मुंबई महानगरपालिकेवर थेट आरोप केला आहे. चौहान म्हणाले, “फुटपाथ हे सामान्य नागरिकांच्या चालण्यासाठी असतात, फटाक्यांसारख्या ज्वलनशील वस्तू विकण्यासाठी नव्हेत. मग मनपा प्रशासनाने या स्टॉल्सना परवानगी कोणत्या आधारावर दिली?”तसेच त्यांनी तीव्र शब्दांत विचारलं “या विक्रेत्यांकडे PESO (Petroleum and Explosives Safety Organisation) संस्थेकडून परवानगी किंवा परवाना आहे का? नसल्यास, हे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखं आहे.”चौहान यांनी पुढे मनपा प्रशासनावर “फुटपाथ विकल्याचा” गंभीर आरोपही केला आहे.
भर रस्त्यात फटाके विकत असल्याने अचानक वाहनांमुळे या फटाक्यांचा स्फोट होण्याची शक्यता देखील तितकीच दाट आहे. ऐन सणावाराच्या दिवसात नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून पालिका मात्र मूग गिळून गप्प का? पालिका या सगळ्यावर कारवाई करण्यास दिरंगाई का करत आहेत, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबईसारख्या विकसित शहरात प्रशासनाची अशी निष्काळजी भूमिका अनेकांना चिंतेत टाकणारी ठरत आहे. जरा दुर्लक्ष झालं तर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिवाळी ही आनंद आणि प्रकाशाचा सण आहे, परंतु जर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झालं, तर हाच सण दु:खात बदलू शकतो. आता सर्वांच्या नजरा मनपा प्रशासनाकडे आहेत. ते कधी आणि काय कारवाई करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, जेणेकरून दिवाळी ही रोषणाईची राहील, धुराची आणि धोक्याची नव्हे! असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.