मुंबई – पुण्यातील सृष्टी कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशनने (एससीएफ) पर्यावरणाशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे. सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे संशोधकांना रायगड जिल्ह्यातील देवघरच्या किनारपट्टीचा ५५ हेक्टरचा भाग पाण्याखाली गेल्याचे आढळून आले आहे. या भागाचे आकारमान साधारणत: मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहा पट आहे.
एससीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक आपटे म्हणाले, सॅटेलाइटने निश्चित केलेला किनारा (पर्यवेक्षण न केलेली वर्गीकरणावर आधारित जलाशयाची सीमा) ३०० ते ५०० मीटर जमिनीच्या बाजूला सरकला आहे, असे निरीक्षणाअंती दिसून आले. या व्यतिरिक्त किनारपट्टीची धूप झाल्यामुळे खारफुटी आणि सुरूची झाडेही उन्मळून पडली आहेत.
१९९० पासून देवघरच्या किनाऱ्याची कशा प्रकारे हळूहळू धूप होत आहे, या संदर्भातील माहिती देवघरमधील रहिवाशांनी दिल्यावर हा ताजा अभ्यास हाती घेण्यात आला. १९९० पासून किनारपट्टीची धूप होण्याची तीव्रता किती आहे हे निश्चित करण्यासाठी संशोधकांनी प्राथमिक विश्लेषण केले आणि या दाव्याची पडताळणी करण्यासाठी गुगल अर्थ इंजिनचा वापर करून लँडसॅट (सॅटेलाइट) डेटासेट्स गोळा केले.






