पुणे : पुणे महापालिकेमध्ये (PMC) अवघ्या ५ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेली उरुळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknatth Shinde) यांनी घेतला आहे. या गावांमध्ये विकासकामे (Development Work) सुरू असल्याने ही गावे वगळू नयेत, अशी भूमिका महापालिकेने मांडली; पण ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला. पुढील १५ दिवसांत या संदर्भातील आदेश निघणार आहेत.
पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांचा समावेश आहे. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने मिळकतकर आकारणी सुरू केली. गावात मूलभूत सुविधांचा अभाव असताना कर घेतला जात असल्याने त्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला होता. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करत उरुळी देवाची आणि फुरसुंगी यांची स्वतंत्र नगरपरिषद करावी, तसेच ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांच्यासह नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.