फोटो सौजन्य - Social Media
बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री उशिरा, तब्बल ११ वाजेपर्यंत उघडी असल्याने संशय निर्माण झाला असून माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात पैशांचे वाटप व मतदार याद्यांचे नियोजन सुरु असल्याचा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे यांनी केला आहे.
रात्री बँक उघडी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रंजनकुमार तावरे व त्यांचे कार्यकर्ते बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाले. त्यावेळी तिथे माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्या व काही कागदपत्रे सापडल्याचा दावा त्यांनी केला. तावरे यांनी असा आरोप केला की, या ठिकाणी पैशांच्या पाकिटांचे नियोजन चालले होते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जात होता.
या सर्व कारभाराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तावरे यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांचे खासगी सहाय्यक सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय देखील घटनास्थळी उपस्थित होते. “सुनील मुसळे रात्री अकरा वाजता बँकेत नेमकं काय करत होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, जलसंपदा विभागातील डूबल नावाचे कार्यकारी अभियंता देखील या कथित घडामोडीत सामील असल्याचा दावा करण्यात आला असून, पाणी वापर संस्थांवर दबाव टाकून त्यांच्या सहकार्याची मागणी केली जात असल्याचा आरोप तावरे यांनी केला. विरोध केल्यास पाणी बंद करण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत काही शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनाही कामावर लावल्याचा आरोप करत, रंजनकुमार तावरे यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.